प्रसाद लाड यांच्या घराबाहेर चोरीचा ऐवज; सापडल्या नाणी, दागिने, देवाच्या मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 06:05 AM2022-07-11T06:05:13+5:302022-07-11T06:05:42+5:30
चोरट्यानं सामान टाकून काढला पळ...
मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंगा येथील निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे पैसे, दागिन्यांची बॅग सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी ही बॅग उघडून बघितली असता त्यात चलनी नाणी, दागिने आणि देवाच्या मूर्ती इत्यादी ऐवज आढळला. हे साहित्य शेजारील इमारतीतील घरातून चोरी केल्याचे समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे आमदार लाड यांच्या घराच्या सुरक्षारक्षकांना ही बॅग दिसली. त्यांनी लाड यांना फोन करून बॅगेची माहिती दिली. लाड यांनी याबाबत पोलिसांना कळवताच, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांना बॅगेत तीन वेगवेगळ्या बॅग होत्या. पोलिसांनी या बॅग उघडून बघितल्या असता त्यात नाणी, सोने, चांदीच्या मूर्ती असा ऐवज होता.
माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारील इमारतीमधील एका घरातून हा ऐवज चोरी करण्यात आला आहे. घराच्या बाथरूममधून आत प्रवेश करून त्याने देवघरातील सामानाची चोरी केली. इमारतीत सध्या कोणी राहण्यास नाही. तसेच सीसीटीव्हीही नाही. प्रसाद लाड यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये देखील काहीही दिसून आलेले नाही.
म्हणून चोरट्याने बॅग टाकून काढला पळ
आमदार लाड यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत, सकाळी सुरक्षारक्षकाने कॉल करून घराबाहेर बॅग असल्याची माहिती दिली. घराबाहेर २४ तास पोलीस संरक्षण असते. पोलिसांना संशयित व्यक्ती दिसल्याने त्यांनी हटकले असता त्याने बॅग टाकून पळ काढला असल्याचे त्यांनी सांगितले.