गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रसंगी एन्काउंटर करू, शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 11:03 AM2022-07-30T11:03:08+5:302022-07-30T11:03:56+5:30
कर्नाटकच्या मंत्र्यांचे वक्तव्य; मंगळुरूत आणखी एक हत्या
बंगळुरू : गुन्हेगारी संपविण्यासाठी उत्तर प्रदेशने जे धोरण राबविले, त्यापेक्षा पाच पावले पुढे जाण्याची कर्नाटकची तयारी आहे. आवश्यकता भासली तरी आम्ही गुन्हेगारांचे एन्काऊंटरही करू शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे उच्च शिक्षण खात्याचे मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी केले आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राबविलेल्या धोरणाप्रमाणे पावले उचलण्याची तयारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दर्शविली होती. भाजप नेते प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बोम्मई यांनी हे उद्गार काढले होते. हत्येने मंगळुरू हादरले
कर्नाटकच्या मंगळुरू शहरात चेहरे झाकलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी २३ वर्षीय युवकाची हत्या केली. मोहंमद फाजील असे या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी एका कापड दुकानासमोर ही घटना घडली. हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. भाजपच्या युवा आघाडीचा नेता प्रवीण नेत्तार याच्या हत्येमुळे जिल्ह्यात प्रचंड तणाव असताना ही घटना घडली. फाजील हा एका कापड दुकानासमोर मोबाइलवर बोलत होता. तेव्हा हल्लेखोर कारमधून खाली उतरले व त्याच्या दिशेने धावले. त्यांचे चेहरे काळ्या कपड्याने झाकलेले होते. हल्लेखोरांनी काठ्यांसह चाकूने हल्ला केला. यात फाजीलचा मृत्यू झाला. आरोपींचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेत्तार (वय २२) यांची बेल्लारीतील त्यांच्या दुकानासमोर दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी मंगळवारी रात्री हत्या केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी चार अज्ञात हल्लेखोरांनी गुरुवारी रात्री फाजील याची हत्या केली.
प्रतिबंधात्मक आदेश लागू
मंगळुरूत गेल्या काही दिवसांत दोन वेगवेगळ्या समुदायाच्या दोनजणांची एकापाठोपाठ हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कर्नाटक-केरळ सीमेलगतच्या ५५ ठिकाणांवरील सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
दरम्यान, तणावपूर्ण वातावरणामुळे दक्षिण कन्नड आणि उडपी जिल्ह्यातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सूरतकल, बाजपे, मुल्की आणि पन्नाम्बुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आली.
तपास एनआयएकडे
nभाजयुमाेच्या कार्यकर्त्याच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्याची घाेषणा मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी केली. प्रवीण नेत्तार यांच्या हत्येप्रकरणी पाेलिसांनी आणखी एकाला अटक केली.
nयाप्रकरणाचा तपास दाेन राज्यांमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे बाेम्मई यांनी सांगितले. हल्लेखाेर केरळमधून आल्याचा कर्नाटक पाेलिसांना संशय आहे.