धडा शिकविण्यासाठी 'त्याने' पत्नीविरुद्ध रचला बनाव; मात्र स्वत:च जाळ्यात अडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 05:58 AM2023-02-25T05:58:38+5:302023-02-25T05:58:55+5:30
४४ लाखांची रोकड जप्त, एकाला अटक
मुंबई - पैशांची उधळपट्टी करणाऱ्या पत्नीला धडा शिकविण्यासाठी आणि दुबईतील सासूने घरासाठी दिलेले ४४ लाख रुपये लाटण्यासाठी लोखंडवाला येथे राहणाऱ्या व्यावसायिकाने लुटीचा बनाव केल्याची धक्कादायक माहिती आग्रीपाडा पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अमीर मोहम्मद बोरा (३०) याला अटक केली आहे.
अंधेरी लोखंडवाला येथील ए स्कायलार्क टॉवर येथे बोरा कुटुंबीयांसोबत राहण्यास आहे. गुरुवारी त्याने आग्रीपाडा पोलिस ठाणे गाठून, साहेब, ना. म. जोशी मार्ग येथून जात असताना पोलीस असल्याची बतावणी करत चौकडीने माझ्याकडील ४४ लाखांची रोकड चोरून नेल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्या माहितीच्या आधारे चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. मात्र व्यावसायिकाने दिलेली माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांमध्ये तफावत दिसून आली. पोलिसांनी त्याच्याकडे उलट तपासणी करताच लूट झालीच नसल्याची माहिती समोर आली.
व्यावसायिकाच्या चौकशीत, पत्नी सतत पैसे खर्च करत होती. तिला पैशांची किंमत नव्हती. त्यात, सासूने घरासाठी ४४ लाख रुपये दिले होते. हे पैसेही पत्नी असेच उडवून टाकेल या भीतीने आणि पैसे चोरी झाल्याचे समजताच तिला पैशांची किंमतही समजेल म्हणून त्यांनी लुटीची खोटी माहिती दिल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अखेर, पोलिसांनी मालाडच्या घरातून रोकड जप्त केली. याप्रकरणी बोराला रात्री अटक झाली. ते इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करतात. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.