Nagpur News: आजची सावित्री! गळफास घेणाऱ्या पतीचे पाय धरून प्राण वाचविले; महिला आनंदाने रडली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 08:26 AM2021-10-31T08:26:44+5:302021-10-31T08:27:15+5:30
Heart touching Story: गळफास लावल्याच्या काही मिनिटांतच पत्नीने पतीचे पाय उचलून धरल्याने मानेवर आवळलेला फास शिथिल झाला. तिचा पती मृत्यूच्या दाढेतून परत आला.
- सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गळफास लावून घेतलेला पती शेवटचे आचके देत असल्याचे बघून पत्नीचा थरकाप उडाला. काही कळायच्या आतच तिने पतीचे पाय वर उचलून धरले. शेजारच्या महिलेने हे दृश्य पाहिले तेव्हा तिला मदत मिळाली. कोमात गेलेल्या पतीला मेडिकलमध्ये भरती केले. डॉक्टरांनी शर्थ केली आणि तिसऱ्या दिवशी पतीला शुद्ध आली.
३८ वर्षीय महिलेचा पती खचून गेला होता. २५ ऑक्टोबरला त्याने पंख्याला दोरी बांधली. स्टूलवर चढून गळफास घेत स्टूल पाडला. आवाजामुळे पत्नीने डोकावून पाहिले आणि तिने लगेच पतीचे पाय धरून. संपूर्ण ताकद लावून वर उचलून धरले. शेजारच्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले.
...अन् ती आनंदाने रडायला लागली
कोमात गेलेल्या पतीला पत्नीने त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मेडिसिन विभागाचे डॉ. अतुल राजकोंडावार यांनी तातडीने उपचार सुरू केले. ‘आयसीयू’मध्ये हलवीत व्हेंटिलेटरवर ठेवले. तीन दिवसांनंतर पतीला शुद्ध आली. पत्नी शेजारीच होती. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.
गळफास लावल्याच्या काही मिनिटांतच पत्नीने पतीचे पाय उचलून धरल्याने मानेवर आवळलेला फास शिथिल झाला. सध्या रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
- डॉ. अतुल राजकोंडावार, औषध वैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल