बृजभूषण सिंहांची बाजू घेतली म्हणून तरुणाला बाऊंसरांची मारहाण; मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 11:13 AM2023-06-19T11:13:18+5:302023-06-19T11:13:31+5:30
सुपरवायझरला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याच्या वडिलांनी सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंहांवर चार्जशीट दाखल झाली आहे. त्यावर येत्या जुलैच्या पहिल्या आठावड्यात सुनावणी होणार आहे. परंतू, आता त्यांचे समर्थक आणि विरोधकांत हाणामाऱ्या होण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. अशाच एका घटनेत ब्रिजभूषण यांचे समर्थन करणाऱ्या तरुणाचा बाऊंन्सरांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.
बिहारच्या आरा जिल्ह्यातील टोल प्लाझावर तैनात असलेला सुपरवायझर बलवंत सिंहला हरियाणाच्या बाउंसरांनी मारहाण केली, यानंतर त्याला ट्रेनमध्ये बसविण्यात आले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला लखनऊच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी त्याचा मृत्यू झाला.
सुपरवायझरला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याच्या वडिलांनी सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच एफआयर दाखल करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यातच मृतदेह ठेवत आंदोलन केले आहे. बलवंत सिंह हा शनिवारी गोंडाला येत होता, वाटेत त्याची प्रकृती बिघडली.
गाडी मानकापूर रेल्वे स्थानकावर येताच प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून आरपीएफचे निरीक्षक उदयराज यांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. तेथून त्याला लखनौ मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले होते. मृतदेह घरी आणून कुटुंबीय अंतिम संस्कार करण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात इंटरनेटवर त्याला मारहाण केल्याचा व्हायरल व्हिडीओ आला. टोल प्लाझावरील बाऊंसर त्याला मारहाण करत होते.
कुटुंबीयांनी माहिती काढली असता बृजभूषण सिंह यांच्यावरील चार्जशीटवर टोल प्लाझाच्या मॅनेजरसोबत त्यांची चर्चा सुरु होती. यावेळी बलवंत सिंहने बृजभूषण यांची बाजू मांडली. यानंतर मॅनेजरच्या बाऊंसरनी बलवंतला चोरीचा आरोप करत आत नेत मारहाण केली. यानंतर गोंडा येथे येणाऱ्या ट्रेनमध्ये जबरदस्तीने बसविण्यात आले.