दीड लाखांची लाच घेताना अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात
By दिनेश पठाडे | Published: August 9, 2023 09:27 PM2023-08-09T21:27:42+5:302023-08-09T21:27:59+5:30
फिर्यादी यांनी कुळाच्या जमिनीचे सेल सर्टिफिकेट करून देण्यासाठी व सातबारावर नाव चढविण्यासाठी प्रकरण दाखल केले होते.
वाशिम : मानोरा तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अनंत राठोड यास दीड लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी यांनी कुळाच्या जमिनीचे सेल सर्टिफिकेट करून देण्यासाठी व सातबारावर नाव चढविण्यासाठी प्रकरण दाखल केले होते.
यामध्ये आरोपी अव्वल कारकून अनंत राठोड यांनी काम करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली होती. पाच दिवसा पासून फिर्यादी पैसे द्यायला तयार होता. मात्र आरोपीस शंका आल्याने पैसे स्वीकारले नाहीत. ९ ऑगस्ट रोजी कार्यालय बंद झाल्यावर आपल्या गावी जाताना आरोपी हा फिर्यादीचे घरी गेला आणि तेथे लाच स्वीकारली. एसीबी चे पथक देखील पाच दिवसा पासून पाळत ठेवून होते.आणि विविध वेष भूषेत वावरत होते.
आरोपी हा घरी येत असल्याचे फिर्यादीने पथकास सांगितल्या वरून पथक तेथे गेले आणि सापळा रचून आरोपीस रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक गजानन शेळके, पोलिस निरीक्षक सुजित कांबळे यांच्या पथकाने केली. याबाबत मानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.