हुंड्यासाठी छळ, विवाहितेची तलावात उडी घेऊन आत्महत्या, पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल
By नितिन गव्हाळे | Published: November 8, 2022 06:04 PM2022-11-08T18:04:47+5:302022-11-08T18:05:50+5:30
पती व सासरच्या लोकांनी श्रद्धाला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नामध्ये मला हुंडा दिला नाही यावरून वाद घालायचे.
अकोला - लग्नात हुंडा कमी दिला. त्यामुळे आता दुकान घेण्यासाठी पतीसह सासरची मंडळी विवाहितेला माहेराहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावायचे आणि तिचा शारीरिक व मानसिक छळ करायचे. पती व सासरकडील लोकांच्या छळाला कंटाळून विवाहितेने मांडोली गावानजीकच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणात बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शेगाव तालुक्यातील तिव्हाण खु. येथील काशीराम पहुरकर(३९) यांच्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी श्रद्धा हिचे लग्न २२ मे २०२२ रोजी बाळापूर तालुक्यातील मांडोली येथील आनंद दादाराव वानखडे(२८) याच्याशी झाले. लग्न होऊन दोन-तीन महिनेच झाले.
पती व सासरच्या लोकांनी श्रद्धाला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नामध्ये मला हुंडा दिला नाही यावरून वाद घालायचे. तसेच महा-ई-सेवा केंद्रासाठी दुकान घ्यायला वडिलांकडून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावायचे. मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचे असेही तक्रारीत नमुद आहे. ५ नोव्हेंबर रोजी पती व सासरच्या मंडळींनी मुलगी श्रद्धा वानखडे हिला घरातून हाकलून दिले. दरम्यान, मुलीने पती व सासरच्या छळाला कंटाळून मांडोली गावाजवळील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या पतीनेच काशीराम पहुरकर व त्यांच्या मुलाला पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. माझ्या मुलीने पती व सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप काशीराम पहुरकर यांनी तक्रारीतून केला आहे.
यांच्याविरुद्ध केला गुन्हा दाखल
बाळापूर पोलिसांनी श्रद्धा वानखडे हिच्या आत्महत्या प्रकरणात पती आनंद दादाराव वानखडे(२८), बंडु दादाराव वानखडे(३०), किरण बंडु वानखडे(२६), दादाराव वानखडे(६२) सर्व रा.मांडोली ता. बाळापूर यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०४(ब)(३४), ४९८(अ), ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला.