मलेशियन कंपनीची सव्वाकोटीची फसवणूक; व्यवहारात लावला चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 10:08 AM2023-04-24T10:08:53+5:302023-04-24T10:09:43+5:30
साखर खरेदीच्या व्यवहारात लावला चुना
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मलेशियन कंपनीला मागणीप्रमाणे साखर पुरवण्याची हमी देऊन आगाऊ सव्वाकोटी रुपये घेऊन फसवणूक झाली आहे. सानपाडा येथे कार्यालय थाटून अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केला आहे. याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलेशियातील मुगामी कुंजिकनन यांची साखर आयात कंपनी आहे. गेल्यावर्षी त्यांनी साखर पुरवठाबाबत ऑनलाइन जाहिरात दिली होती. त्यावरून ग्रॉसली इम्पोर्ट नावाच्या कंपनीने त्यांना ई-मेल करून क्रिस्टल व्हाइट साखर उपलब्ध असल्याचे सांगितले. गडहिंग्लजच्या साखर कारखान्याचे लेटरहेडदेखील दाखवले. त्यानुसार मुगामी यांनी १५ कोटी ६१ लाखांत ४,०५० मेट्रिक टन साखरेचा व्यवहार ठरवला. तसेच संबंधितांच्या बँक खात्यात १ कोटी ९ लाख रुपये आगाऊ रक्कम म्हणून पाठवले होते.
कार्यालय बंद आढळले
सातत्याने वेगवेगळ्या कारणांनी त्यांना साखर पाठवण्याचे टाळले जात होते. यामुळे त्यांना संशय आल्याने मुंबईत राहणाऱ्या नातेवाईकामार्फत कार्यालयाला भेट दिली असता कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे झालेल्या फसवणुकीबाबत त्यांनी मलेशियन पोलिसांकडे तक्रार केली असता सानपाडा येथून गुन्ह्याची सूत्रे हलल्याने सानपाडा पोलिसांकडे त्यांनी नातेवाइकामार्फत तक्रार केली आहे. त्याद्वारे दुराईराज गणपथी, गणपथी शर्मिला रोशन व गणपथी शर्मिला नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.