निकीता हत्याप्रकरणातील आरोपी तौशीफचं मोठं राजकीय कनेक्शन

By महेश गलांडे | Published: October 28, 2020 11:11 AM2020-10-28T11:11:49+5:302020-10-28T11:14:18+5:30

पोलिसांनी अटक केलेल्या तौशीफच्या कुटुंबातील सदस्यच आमदार-खासदार आहेत. तौशीफचे आजोबा मरहूम कबीर अहमद हे मेवात विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

Toushif's big political connection in Nikita murder case of faridabaad | निकीता हत्याप्रकरणातील आरोपी तौशीफचं मोठं राजकीय कनेक्शन

निकीता हत्याप्रकरणातील आरोपी तौशीफचं मोठं राजकीय कनेक्शन

Next
ठळक मुद्देपोलिसांनी अटक केलेल्या तौशीफच्या कुटुंबातील सदस्यच आमदार-खासदार आहेत. तौशीफचे आजोबा मरहूम कबीर अहमद हे मेवात विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

फरीदाबाद - शहरातील एका कॉलेज युवतीची कॉलेजच्या गेटबाहेरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी मुख्य आरोपी तौशीफसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. मृत विद्यार्थींनी बी-कॉम च्या तिसऱ्या वर्गात शिकत होती, सोमवारी सायंकाळी 4 वाजता पेपर देऊन कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर तिच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. बल्लभगढ येथील अग्रवाल कॉलेजबाहेर ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने सोहना-बल्लभगढ रस्त्यावर रास्ता रोको केला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली असून आरोपी तौशीफकचं मोठं राजकीय कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. 

पोलिसांनी अटक केलेल्या तौशीफच्या कुटुंबातील सदस्यच आमदार-खासदार आहेत. तौशीफचे आजोबा मरहूम कबीर अहमद हे मेवात विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर, तौशीफचे काका खुर्शीद अहमद हे एकदा संयुक्त पंजाबमध्ये आणि चारवेळा हरयाणातील मेवात मतदारसंघातून आमदार बनले आहेत. विशेष म्हणजे फरीबाद मतदारसंघातून एकदा खासदार म्हणूनही ते निवडून आले आहेत. सध्या खुर्शीद अहमद यांचे पुत्र आणि आरोपी तौशीफचे चुलत भाऊ असलेले अफताब अहमद हे सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. नूँह विधानसभा मतदारसंघातून ते आमदार बनले असून 2014 पर्यंत मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा यांच्या मंत्रिमंडळात परिवहनमंत्रीही होते. तसेच, तौशीफच्या आणखी एका काकाने 2019 मध्ये सोहना विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.  

पोलिसांनी निकीता हत्याप्रकरणी तौशीफसह त्याचा मित्र रिवासन नूँह यालाही अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेची संवेदनशीलता आणि गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त ओपी सिंह यांनी गुन्ह्याच्या चौकशीसाठी विशेष समिती गठीत केली आहे. याप्रकरणी मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तौशीफने यापूर्वीही केले होते अपहरण

उत्तर प्रदेशच्या हापूल येथील मूळ रहिवाशी असलेल्या निकिता तोमरचे कुटुंबीय फरीदाबाद येथे शिफ्ट झाले होते. याप्रकरणी मुलीचे वडिल मूलचंद तोमर यांनी सांगितले की, तौशीफ नावाचा मुस्लीम कुटुंबातील मुलगा 12 वी पर्यंत निकीतासोबतच शिक्षण घेत होता. यावेळी, निकीतासोबत मैत्री करण्याचा प्रयत्नही त्याने अनेकदा केला असून तिचे धर्मांतर करण्याचा त्याचा डाव होता. मैत्री आणि जबरदस्ती विवाहासाठी नकार दिल्यानंतर तौशीफने सन 2018 साली निकाताचे अपहरण केले. मात्र, बदनामीच्या कारणास्तव त्यावेळी कुटुंबीयांना ते प्रकरण आपापसात मिटवले होते. निकीता ही हुशार विद्यार्थीनी होती. शाळेत 95 टक्के गुण मिळवल्यानंतर, एअर फोर्समध्ये करिअर करण्याची तिची इच्छा होती. मात्र, तौशीफने एकतर्फी प्रेमातून तिची हत्या केली. 

परीक्षा देण्यासाठी निकिता कॉलेजला गेली

वडिलांच्या सांगण्यानुसार, सोमवारी परीक्षा देण्यासाठी निकीता कॉलेजला गेली होती. पेपर सुटल्यानंतर सायंकाळी 4 वाजता तिची आई आणि भाऊ कॉलेजबाहेर निकीची वाट पाहत होते. त्यावेळी, अचानक एक कार तेथे आली, त्या कारमधून आलेल्या तीन ते चार जणांनी निकीताला गाडीत खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये, तौशीफ सर्वात पुढे होता. मात्र, निकिताच्या भावाला पाहिल्यानंतर तौशीफने निकीतावर गोळी झाडली. शेजारीच असलेल्या निकीताच्या मैत्रिणीने पोलिसांना फोन करुन यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निकिताल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.

Web Title: Toushif's big political connection in Nikita murder case of faridabaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.