दुप्पट रकमेसाठी व्यावसायिकाने मोजले १० लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 06:08 AM2021-12-27T06:08:04+5:302021-12-27T06:08:18+5:30
Crime News : फिरोज हा जुन्या नोटांच्या मोबदल्यात या नव्या नोटांची दुप्पट रक्कम देणार होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार गुंतवणूक करण्यास तयार झाले. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी ते खारमध्ये भेटले.
मुंबई : दुप्पट रक्कम देण्याच्या नावाखाली चुनाभट्टीमध्ये एका व्यावसायिकाची १० लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत.
एका खासगी संस्थेत अध्यक्ष पदावर असलेल्या ४९ वर्षीय तक्रारदाराची यात फसवणूक झाली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१२ मध्ये त्यांची कमलेश ठाकूर नावाच्या चालकासोबत ओळख झाली होती. त्यांनी घराच्या विक्रीतून कर्ज फेडले. त्यानंतर खात्यातील उर्वरित १० लाख रुपये योग्य गुंतवणुकीसाठी चौकशी सुरू केली.
यादरम्यान कमलेशने फिरोज खान नावाच्या व्यक्तीबाबत त्यांना सांगितले. तसेच फिरोज याने ५०० रुपयांच्या एकापाठोपाठ सिरीजच्या दिलेल्या दोन नवीन नोटा कमलेशने दाखविल्या. फिरोज हा जुन्या नोटांच्या मोबदल्यात या नव्या नोटांची दुप्पट रक्कम देणार होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार गुंतवणूक करण्यास तयार झाले. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी ते खारमध्ये भेटले.
तक्रारदार यांनी फिरोजला १० लाख रुपये देऊन त्याच्याकडून २० लाख रुपये घेण्याचे ठरवले. त्यानुसार, ठगांनी त्यांच्याकडील पैसे घेत पळ काढला. पाठपुरावा करून देखील पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार केली.