‘झवेरी’तील सराफाची फसवणूक, १३ लाखांचे दागिने घेऊन व्यापारी पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 02:56 AM2020-07-11T02:56:58+5:302020-07-11T02:57:16+5:30
तक्रार अर्जावरून चौकशीअंती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने ते आरोपीचा शोध घेत आहेत.
मुंबई - झवेरी बाजारातील सराफाच्या दुकानात चांदीची भांडी आणि सोन्याचे दागिने खरेदीसाठी आलेला व्यापारीच ठग निघाल्याने, सराफाला १३ लाख रुपयांचा फटका बसला आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरगाव परिसरात राहणारे गौरव सुंदरलाल जैन (२९) यांचे झवेरी बाजारात सोने-चांदीचे दागिने व वस्तू विक्रीचे दुकान आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जून रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास एक ग्राहक दुकानात धडकला. त्याने सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी खरेदी करायचे असल्याचे सांगितले. स्वत:चे नाव योगेश सुकेनकर असल्याचे सांगून, कल्याणमध्ये सुकेनकर ज्वेलर्स नावाचे दुकान असल्याचे नमूद केले. झवेरी बाजारातील अनेक व्यापाऱ्यांसोबत चांगले संबंध असून, त्यांच्याकडून नियमित व्यवहार होत असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.
जैन यांनीही विश्वास ठेवून त्याच्या मागणीप्रमाणे चांदीची भांडी आणि ७१ तोळे सोन्याचे दागिने दिले. त्यानंतर त्याने त्याच्याकडे सध्या रोख रक्कम नसल्याने धनादेश दिला. सुरुवातीला जैन यांनी नकार दिला; मात्र त्यांना बोलण्यात गुंतवून दागिने आणि भांडी घेऊन तो निघून गेला. जैन यांनी तत्काळ ओळख सांगितलेल्या व्यापाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांनी ते अशा कुठल्याच व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगताच जैन यांना धक्का बसला. त्यांनी धनादेश घेऊन बँकेत धाव घेतली. तेथेही योगेशने ज्या बँक खात्याचा धनादेश दिला होता ते खाते बंद असल्याची माहिती मिळाली. योगेशने दिलेला मोबाइल क्रमांकही बंद आल्याने यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. यात, १२ लाख ८१ हजार रुपये किमतीचा दागिन्यांवर ठगाने हात साफ केला आहे. त्यानुसार तक्रार अर्जावरून चौकशीअंती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने ते आरोपीचा शोध घेत आहेत.
योगेशने दिलेला मोबाइल क्रमांकही बंद आल्याने यात आपली फसवणूक झाल्याचे कळाले. १२ लाख ८१ हजार रुपये किमतीचा दागिन्यांवर ठगाने हात साफ केला आहे.