‘बुलेट’ राजाचा हायवॉल्टेज ड्रामा; भरचौकात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:06 AM2021-09-29T11:06:12+5:302021-09-29T11:11:37+5:30
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मॉडिफाइड बुलेटला चलान लावल्याने नाराज झालेल्या युवकाने आणि त्याच्या कुटुंबीयांने हायवॉल्टेज ड्रामा केला आहे.
मेरठ – अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की वाहतुकीचे नियम भंग केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई होते. यात काही वाहनचालक पोलिसांसोबत हुज्जत घालतात. त्यातून वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये वाद होतात. पण यूपीमध्ये सध्या एक हायवॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. ज्यात एक बुलेटचालक आणि त्याच्या कुटुंबीयांनी भरचौकात गोंधळ घातल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मॉडिफाइड बुलेटला चलान लावल्याने नाराज झालेल्या युवकाने आणि त्याच्या कुटुंबीयांने हायवॉल्टेज ड्रामा केला आहे. कमिश्नर चौकात युवकाने स्वत:वर पेट्रोल टाकलं. तर दुसरीकडे युवकाच्या नातेवाईकांनी पोलिसांवर एन्काऊंटर करण्याची धमकी दिल्याचा आरोप करत गोंधळ घातला. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी युवक आणि त्याच्या घरच्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आता तिघांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी मेरठच्या कमिश्नर चौकात पती-पत्नी आणि एक मुलगा पोहचला. याठिकाणी पोलिसांवर आरोप करत त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कमिश्नर कार्यालयाबाहेर गोंधळ पाहताच उपस्थित असणारे पोलीस कर्मचारी तात्काळ धावले. इतक्यात त्या युवकाने स्वत:वर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं गोंधळ घालणाऱ्या युवकाला आणि त्याच्या कुटुंबीयाला पकडलं.
मवाना रोडवरील गंगानगर परिसरात राहणाऱ्या रोहित नावाचा युवक २७ तारखेला सकाळी ११ वाजता मोटारसायकवरून आई मुकेश देवी यांची औषधं आणण्यासाठी मेडिकल स्टोअरला गेला होता. यावेळी पोलीस चेकींग सुरू होते. पोलिसांनी रोहितला अडवलं आणि त्याने मॉडिफाइड केलेल्या बुलेटचं चलान कापलं. या चलानची रक्कम १६ हजार रुपये होती. त्यावरून पोलीस आणि रोहित यांच्यात वाद झाला. युवकाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, पोलीस आणि अधिकाऱ्यांनी युवकाला इन्काऊंटर करण्याची धमकी दिली.
मंगळवारी सकाळी रोहित त्याची आई मुकेश देवी आणि वडील अशोक कुमार हे एसपी वाहतूक ऑफिस इथं पोहचले त्यानंतर कमिश्नर चौकात आले. त्याठिकाणी युवक आणि त्याच्या आईवडिलांनी गोंधळ घातला. यावेळी रोहितनं स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. पोलीस अधिकारी देवेश सिंह म्हणाले की, ३ दिवसांपूर्वी युवकाच्या बाईकवर कारवाई केली होती. गाडी सीज करण्यात आली होती. बुलेट मॉडिफाइड करण्यात आली होती. सध्या हे तिघं पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे.