वाहतूक पोलिस अधिकाऱ्याचे दुचाकीस्वाराने दगडाने फोडलं डोकं; कारवाईच्या रागातून घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 08:52 PM2021-08-13T20:52:28+5:302021-08-13T20:53:00+5:30
Beaten to Traffic police officer in kalyan : वाहतूक पोलिसांकडून सकाळी आणि संध्याकाळी शहरातील मुख्य चौकांमध्ये नाकाबंदीची कारवाई सुरू आहे.
कल्याण: कल्याण वाहतूक पोलिसांकडून शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान शहाड पूलाच्या ठिकाणी नाकाबंदीची कारवाई सुरू असताना राहुल रोकडे या दुचाकीस्वाराने कारवाई केल्याच्या रागातून सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक प्रकाश पटाईत यांच्या डोक्यात दगड मारुन त्यांना जखमी केल्याचा प्रकार घडला. पटाईत यांच्यावर केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचार सुरू असून राहुलला अन्य वाहतूक पोलिस कर्मचा-यांनी पकडून महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.
वाहतूक पोलिसांकडून सकाळी आणि संध्याकाळी शहरातील मुख्य चौकांमध्ये नाकाबंदीची कारवाई सुरू आहे. यात हेल्मेट न घालणो, सिटबेल्ट न लावणो, रिक्षा चालकांनी गणवेश आणि बॅच परिधान न करणो याबाबत कारवाई केली जात आहे. संध्याकाळी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक प्रकाश पटाईत हे दोन हवालदारांसह शहाड पूलाच्या परिसरात कारवाई करीत होते. त्यावेळी भरधाव वेगात दुचाकी चालविणा-या राहुलला त्यांनी हटकले. परंतू राहूलने दुचाकी थांबवली नाही तो अधिक वेगाने दुचाकी पळवू लागला. पटाईत आणि दोन हवालदारांनी त्याचा पाठलाग केला.
काही अंतरावर त्याला अडविण्यात आले. दुचाकी अडविल्याचा राहुलला राग आला आणि त्याने रस्त्याच्या बाजुला असलेल्या दगडाने पटाईत यांच्या डोक्यावर प्रहार केला. यात पटाईत जखमी झाले तर राहुलला दोन्ही हवालदारांनी पकडून महात्मा फुले पोलिसांच्या हवाली केले. राहुल हा धाकटे शहाड परिसरातील राहणारा आहे अशी माहीती वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक सुखदेव पाटील यांनी दिली.