वाहतूक पोलिसांनी 400 जणांची ‘फिल्म’ उतरवली, काळ्या काचांच्या विरोधात मोहिम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 06:16 PM2021-01-29T18:16:39+5:302021-01-29T18:18:27+5:30
Thane Traffic Police : ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
ठाणे: सुरक्षेच्या कारणांमुळे वाहनांच्या काचांवर काळ्या रंगाची फिल्म लावण्यास बंदी घातलेली आहे. तरीही त्याचे अनेकांकडून सरास उल्लघन केले जाते. अशा वाहन चालकांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. एका दिवसात तब्बल ४०० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यासोबतच काचांवरील काळी फिल्म पोलिसांनी काढली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
ठाणे वाहतूक पोलिसांनी एकाच रात्रीत केली ७७ मद्यपी चालकांवर कारवाई
1 महिन्यात सव्वा तीन कोटींचा दंड वसूल, ठाणे वाहतूक पोलिसांकडून विक्रमी कामगिरी
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दितल्या काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश ठाणे, कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर या परिक्षेत्रातील वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानुसार गुरूवारपासून ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी कारवाई सुरू केली. पहिल्याच दिवशी ४०० वाहन चालकांवर कारवाई झाली आहे. त्यात सर्वाधिक ४८ वाहने कापूरबावडीच्या हद्दित आढळली आहेत. तर, सर्वात कमी म्हणजेच सात वाहनांवर अंबरनाथ येथे कारवाई झाली. ठाणे नगर (२६), कोपरी (१६), नौपाडा (१९), वागळे (२०), कासारवडवली (३७), राबोडी (१९), कळवा (२८), मुंब्रा (१५), भिवंडी (८), नारपोली (३४), कोनगाव (१६), कल्याण (२१), डोंबिवली (२०), कोळशेवाडी (२९), विठ्ठलवाडी (१०), उल्हासनगर (२७) आणि अंबरनाथ (७) या विभागातही कारवाई झाली आहे.