नवजात बालकांची तस्करी! CBI ने केला भांडाफोड; आरोपींना अटक, 8 बालकांचे रेस्क्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 01:27 PM2024-04-06T13:27:31+5:302024-04-06T13:27:38+5:30
Delhi NCR Crime: सहा लाख रुपयांमध्ये नवजात बालकाची विक्री. एक अवघ्या 36 तासांचा, तर दुसरा 15 दिवसांचा.
CBI Human Trafficking: केंद्रीय तपास यंत्रणा, म्हणजेच CBI ने दिल्ली-एनसीआरमधील हॉस्पिटलमधून नवजात बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला. तपास यंत्रणेने 7 ते 8 चिमुकल्यांची सुटकाही केली आणि काही आरोपींनाही ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींचे दिल्ली-एनलीआरसह इतर राज्यातही जाळे पसरलेले आहे. सीबीआयने या संदर्भात इतर राज्यांमध्येही छापे टाकले असून, सध्या याप्रकरणी तपास सुरू आहे.
#WATCH | CBI conducted raids at several locations in Delhi yesterday, in connection with child trafficking. During the raid, the CBI team rescued two newborn babies from a house in Keshavpuram.
— ANI (@ANI) April 6, 2024
CBI is interrogating the woman who sold the children and the person who bought them… pic.twitter.com/ugGTukT8QC
अनेक राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिल्लीतील केशव पुरम भागात एका घरावर छापा टाकण्यासाठी सीबीआय आणि पोलिसांचे पथक आल्याने खळबळ उडाली. दोन दिवस चाललेल्या या छाप्यानंतर सीबीआयने लहान बालकांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत 7 ते 8 नवजात बालकांची सुटका केली. धक्कादायक बाब म्हणजे, एका नवजात अर्भकाचे वय अवघे 36 तास आहे, तर दुसरा 15 दिवसांचा आहे.
वॉर्ड बॉयसह अनेक ताब्यात
सीबीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात काम करणारा नीरज नावाचा वॉर्ड बॉय, इंदू नावाची महिला आणि इतर काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. काही रुग्णालयांमध्ये नवजात अर्भकांची खरेदी-विक्रीही सुरू असल्याची माहितीही सीबीआयला मिळाली आहे.
चार ते सहा लाख रुपयांना मुलांची विक्री
सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपी हे फेसबुक पेजेस आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर जाहिरातींच्या माध्यमातून मुले दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या अपत्यहीन जोडप्यांशी संपर्क साधायचे. आरोपींनी खऱ्या पालकांकडून, तसेच सरोगेट मातांकडून बाळे विकत घेतल्याचा आरोप आहे. या बालकांची 4 ते 6 लाख रुपयांमध्ये विक्री व्हायची. आरोपींनी बनावट दत्तक कागदपत्रे तयार करुन अनेक अपत्यहीन जोडप्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.