अमली पदार्थाच्या वाहतुकीसाठी रेल्वे सर्वात सुरक्षित मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 07:04 PM2019-10-28T19:04:57+5:302019-10-28T19:28:37+5:30
आंतरराज्य अमली पदार्थ वाहतुकीसाठी रेल्वे हा अत्यंत सुलभ मार्ग असल्याचे गोव्यात घडलेल्या दोन घटनावरून सिद्ध झाले आहे.
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव - आंतरराज्य अमली पदार्थ वाहतुकीसाठी रेल्वे हा अत्यंत सुलभ मार्ग असल्याचे गोव्यात घडलेल्या दोन घटनावरुन सिद्ध झाले आहे. 15 दिवसांच्या अंतरात मडगाव रेल्वे स्थानकावर झालेल्या दोन घटनात तब्बल 15 लाखांचा गांजा पकडला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी गुजरातातही रेल्वेतून आलेला 3.50 कोटींचा मेफेड्रोन हा जवळपास साडेसात किलो सिंथेटिक ड्रग पकडल्याने या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
मागच्या शुक्रवारी मडगावच्या रेल्वे स्थानकावर दीपक कुमार व राजकुमार या दोन बिहारी युवकांना रेल्वे पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून 6.12 किलो गांजा पकडला होता. बिहारच्या गरीब रथ या रेल्वेतून हा माल आणला गेला होता. त्यापूर्वी 16 ऑक्टोबर रोजी केरळहून गुजरातला जाणा:या रेल्वेत रेल्वे पोलिसांना एका बेवारस बॅगेत सात किलो गांजा सापडला होता. या दोन्ही घटनांत पकडलेल्या एकूण अंमली पदार्थाची रक्कम 15 लाखांच्या आसपास होती.
गोव्यातील या घटना ताज्या असतानाच रविवारी सुरत (गुजरात) येथेही राजधानी एक्सप्रेसमधून आलेला साडेतीन कोटींचा माल पकडला होता. त्यात हरियानातील दोघांना अटक केली होती. हे दोन्ही युवक दिल्लीतून आले होते.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, पूर्वी गोव्यात बसमार्गे अंमलीपदार्थ आणला जायचा मात्र आता तो रेलमार्गे आणला जातो. पूर्वी गोणपाटात घालून अंमलीपदार्थ पाठविले जायचे. मात्र आता अशा गोणपाटाकडे पोलिसांचे सहज लक्ष जात असल्यामुळे बॅगेत घालून तो आणला जातो. अशा बॅगा प्रवाशांच्या बॅगामागे लपवून ठेवल्या जातात त्यामुळे सहसा त्यांच्याकडे पोलिसांचे लक्ष जात नाही. केरळहून आलेला गांजाही अशाच एका बॅगमध्ये ठेवण्यात आला होता. रेल्वे पोलिसांना तो बेवारस स्थितीत सापडला होता.
दोन दिवसांपूर्वी मडगावच्या रेल्वे स्थानकावर मात्र आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. दीपककुमार या युवकाने बिहारहून तब्बल सहा किलो गांजा आणला होता. या अंमली पदार्थाचा ताबा घेण्यासाठी राजकुमार हा रेल्वे स्थानकावर आला होता. त्यावेळी दोघांना रंगेहात पकडण्यात आले. यापूर्वी हा दीपककुमार तब्बल 22 वेळा गोव्यात आल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले असून हे दोन्ही युवक दक्षिण गोव्यातील विविध भागात या अंमली पदार्थाचा पुरवठा करत असत असेही चौकशीत उघड झाले आहे. मागच्या वर्षी दक्षिण गोव्यात अंमलीपदार्थ विषयक 77 प्रकरणो उघडकीस आली होती. यंदा पहिल्या दहा महिन्यांतच हा आकडा 66वर पोहोचला आहे.