मुलगा नको म्हणत असतानाही व्यवहार; ऑनलाइन खरेदीपोटी आईची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:20 AM2023-02-21T07:20:45+5:302023-02-21T07:21:04+5:30
आशा रवींद्रनाथन या गृहिणी मीरा रोडच्या शांती पार्कमधील पूनम कॉम्प्लेक्समध्ये दोन मुलांसह राहतात.
मीरा रोड : जुने फर्निचर खरेदीच्या बहाण्याने कॉल करून महिलेची ऑनलाईन १ लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्या आधी ती अनोळखी व्यक्ती फसवणुकीचा प्रयत्न करत असल्याचे महिलेच्या मुलाने निदर्शनास आणून दिले होते, मात्र त्यानंतरही आईने व्यवहार केल्याने त्यांना एक लाख रुपये गमवावे लागले.
आशा रवींद्रनाथन या गृहिणी मीरा रोडच्या शांती पार्कमधील पूनम कॉम्प्लेक्समध्ये दोन मुलांसह राहतात. आशा यांनी घरातील जुने फर्निचर ओएलएक्सवर ३५ हजार किंमत ठरवून विक्रीसाठी पोस्ट केले होते. त्यांना अनोळखी इसमाचा कॉल आला आणि त्याने फर्निचर ३५ हजारांना खरेदीची तयारी दर्शवली. अनोळखी इसमाने पाठवलेला क्युआर स्कॅन केला असता २० हजार रुपये भरा, असा संदेश आला. हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे मुलाने ओळखून आई आशा हिला सांगितले.
अशी फसवणूक
मुलगा शिकवणीला गेल्यानंतर अनोळखी इसमाने आशा यांना कॉल केला. गैरसमज झाल्याचे सांगून आशा यांना क्यूआर कोड पाठवला. आशा यांनी तो स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून थोडे, थोडे करत १ लाख रुपये गेले. ही रक्कम मोहम्मद अली, जगदीश प्रसाद राठोड, सोनू आदींच्या नावे पैसे जमा झाले. अखेर आशा यांनी नया नगर पोलिसांत तक्रार दिली.