२८९ खात्यांमध्ये वळते केले साडेचौदा कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 06:30 AM2021-01-08T06:30:57+5:302021-01-08T06:31:46+5:30

‘आयडीबीआय’वर संशयाची सुई

transfer of 14.5 crore rupees in 289 accounts | २८९ खात्यांमध्ये वळते केले साडेचौदा कोटी

२८९ खात्यांमध्ये वळते केले साडेचौदा कोटी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत असलेले खाते हॅक करून १४ कोटी ५० लाख रुपये काढण्यात आले होते. हे पैसे हॅकरने तब्बल २८९ खात्यांत वळवले आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच शंकर नागरी बँकेने या ठिकाणी खाते उघडले होते.  


शंकर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आयडीबीआय बँकेवर आरोप केले आहेत. ते म्हणाले, आरटीजीएस करण्याची व्यवस्था सहकारी बँकेत नाही. त्यामुळे बँकेने ‘आयडीबीआय’मध्ये खाते उघडून तिथे रक्कम डिपॉझिट ठेवली होती. आमच्या या खात्यात १४ कोटी ५० लाख रुपये होते. काही दिवसांपूर्वी आम्हाला बँकेने रक्कम डिपॉझिट करण्यास सांगितले, त्यावेळी ही बाब उघडकीस आली. त्यात तब्बल २८९ अनोळखी खात्यांत ही रक्कम  वळविल्याचे लक्षात आले. त्यानंतर आयडीबीआयला कळविण्यात आले; परंतु, त्यांनी चालढकल केली. १७ डिसेंबरला या खात्यातून पहिल्यांदा अनोळखी व्यक्तीच्या खात्यात रक्कम पाठविण्यात आली. २ जानेवारीपर्यंत हा प्रकार सुरूच होता. आयडीबीआयला आम्ही अनेक वेळा ओटीपी आणि विवरण मागितले. परंतु, त्यासाठीही टाळाटाळ करण्यात आली, असा आरोप पोकर्णा यांनी केला. 
नेटबँकिंग सुरू करा म्हणून ८ डिसेंबर रोजीच बँकेला पत्र दिले होते. या सर्व प्रकाराला आयडीबीआय बँक जबाबदार आहे. याबाबत पोलीस आणि आरबीआयकडे तक्रार दिली आहे, असेही पोकर्णा म्हणाले.  
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत येथील आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आमच्या बँकेकडून तपासणी तसेच चौकशीसाठी पथक येणार आहे. त्यानंतरच नेमका काय प्रकार झाला, ते पुढे येईल, असे सांगत कुठलीही प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिला.

आयटी सेल करणार तपासणी
n बँकेतील सायबर हल्ला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथून आयटीचे पथक येणार आहे. 
n त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. हे पथक नांदेडमध्ये 
आज, शुक्रवारी दाखल होण्याची शक्यता आहे. 

इतर चार बँकांमध्ये 
असाच प्रकार
राज्यात इतर चार बँकांचे पैसेही आयडीबीआयच्या खात्यातून हॅकरने लंपास केले आहेत. त्यात ओझर मर्चंट, नाशिक, देवडा मर्चंट, नाशिक, धुळे विकास बँक आणि नगर शहर बँकेचा समावेश असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष पोकर्णा यांनी दिली. याबाबत पोलीस आणि आरबीआयकडे तक्रार दिली आहे, असेही पोकर्णा म्हणाले.  

Web Title: transfer of 14.5 crore rupees in 289 accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.