‘नीट’प्रकरणी दाेघा आराेपींचे हस्तांतरण; CBI करणार तपास, लातूर न्यायालयाची परवानगी
By राजकुमार जोंधळे | Published: July 2, 2024 05:17 AM2024-07-02T05:17:48+5:302024-07-02T05:19:03+5:30
पुढील तपासासाठी लातुरात पाेलिस काेठडीत असलेल्या दाेघांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे पथक दिल्लीतून रविवारी लातुरात धडकले.
लातूर - नीट गुणवाढीसंदर्भात लातुरात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चारपैकी दाेघांना लातूर पाेलिसांनी आठ दिवसांपूर्वीच अटक केली असून, त्यांच्या हस्तांतरणासाठी लातूर न्यायालयात साेमवारी सीबीआयने विनंती केली. दाेन्ही आराेपींचा ताबा देण्यासंदर्भात लातूर न्यायालयाने परवानगी दिली असून, आराेपींना मंगळवारी सीबीआयच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नीट गुणवाढीसंदर्भातील गुन्ह्यात आराेपी मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण, शिक्षक संजय जाधव यांच्या चाैकशीत दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या गंगाधरचे नाव समाेर आले. लातुरातील आराेपी आणि दिल्लीतील गंगाधर यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावणारा इरण्णा काेनगलवार अद्याप तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही. गंगाधारला दिल्लीतून सीबीआयने अटक केली. आता पुढील तपासासाठी लातुरात पाेलिस काेठडीत असलेल्या दाेघांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे पथक दिल्लीतून रविवारी लातुरात धडकले. त्यांनी स्थानिक तपास यंत्रणांकडून तपास हाती घेतला आहे. त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. साेमवारी सकाळी ११ वाजता न्यायालयाला विनंती करून दाेन्ही आराेपींचा ताबा मागितला. त्याला लातूर न्यायालयाने परवानगी दिली आहे.
सीबीआयने केली स्थानिक तपास यंत्रणाबराेबरच चर्चा
नीट गुणवाढसंदर्भात पाेलिस काेठडीत असलेल्या दाेघा आराेपींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिल्ली येथील सीबीआयचे पथक लातुरात रविवारी दाखल झाले. त्यांनी स्थानिक तपास यंत्रणा, एटीएसशी चर्चा केली.
सीबीआयच्या वकील म्हणाले...
साेमवारी ११ वाजता लातूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सीबीआयचे अधिकारी, वकील हजर झाले. यावेळी सीबीआयचे वकील म्हणाले, आम्ही तपास हाती घेतला असून, दाेघा आराेपींना आमच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी, असे पत्र न्यायालयाला दिले.
तपास अधिकारी म्हणाले...
या प्रकरणात आठ दिवसांपासून तपास करणाऱ्या लातूर येथील पाेलिस पथकाने आपले म्हणणे न्यायालयात मांडले. आमचा तपास पूर्ण झाला असून, आता पुढील तपास सीबीआयकडे आहे. याबाबतचे पत्र तपास पथकाचे पाेलिस उपाधीक्षक भागवत फुंदे यांनी न्यायालयाला दिले.
न्यायाधीशांनी दिली परवानगी...
याप्रकरणात लातूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायाधीश एम. एन. चव्हाण यांनी दाेन्ही आरोपींच्या हस्तांतरणाला परवानगी दिली. सध्या हे दोन्ही आरोपी लातुरात २ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. त्यांचा ताबा सीबीआयला घेता येईल, असेही न्यायालयाने साेमवारी सांगितले.