भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणाऱ्या ‘कस्टम’च्या अधिकाऱ्यांची बदली !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 08:41 PM2019-07-31T20:41:59+5:302019-07-31T21:01:24+5:30
कार्गोतील गैरसुविधा चव्हाट्यावर आणल्याने बदला; सोशल मीडियावरुन टीकेची झोड
मुंबई - केंद्रीय सीमा शुल्क (कस्टम) विभागातील मुंबईतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची अकस्मित बदली सध्या अधिकारी व कर्मचारी वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. राजीव शक्तीवेल आणि सहाय्यक आयुक्त दीपक पंडीत यांची एअर कार्गोच्या दक्षता विभागातून अन्यत्र हलविण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहे.
सीमा शुल्क विभागाच्या दिल्लीतील मुख्यालयातून दोघांच्या बदलीचे आदेश २२ जुलैला जारी करण्यात आले आहेत. दीपक पंडीत यांची ‘सीजीएसटी’मध्ये बदली करण्यात आली आहे, उपायुक्त दर्जाच्या तिघा अधिकाऱ्यांची गैरव्यवहाराचे प्रकरण त्यांनी चव्हाट्यावर आणले होते. त्याची चौकशी प्रलंबित असताना दबावातून त्यांची कार्गो येथील दक्षता विभागातून केवळ सात महिन्यामध्ये बदली करण्यामागे ‘आयआरएस’ व ठेकेदारांची लॉबी कार्यरत असल्याचा आरोप सोशल मीडियातून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडली असताना मुळचे क्रिकेटर असलेल्या दीपक पंडीत यांनी गेल्या तीन दशकाच्या कार्यकाळात सीमा शुल्क विभागात विविध कक्षामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. वांद्रेतील अल्फा येथे असताना त्यांनी केलेली कारवाई चर्चेचा विषय बनली होती. सात महिन्यापूर्वी त्यांना एअर कार्गोच्या दक्षता विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडाका लावला होता. अवैध व कर चुकवून आणण्यात आलेले कोट्यावधीचे घड्याळे व अन्य किंमत ऐवज जप्त केला होता. त्याचप्रमाणे कार्गो येथे सेवा पुरवित असलेल्या ‘जिविके’ व मिहाल कंपनीच्या गैरसुविधा व निकृष्ट दर्जाच्या साहित्याबाबत नोटीसा बजाविल्या होत्या. हे प्रकरण अंगलट येण्याच्या शक्यतेमुळे संबंधित कंपनीचे अधिकारी व ‘आयआरएस’ लॉबी अडचणीत होती. त्यामुळे त्यांनी केंद्रातून दबाव आणून पंडीत यांची अवघ्या ७ महिन्यात तेथून बदली केल्याची चर्चा विभागात सुरु आहे. या निर्णयाच्या विरोधात व्हाट्सअप, ट्विटर आणि फेसबुकवरुनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणाची सविस्तर माहिती घेवून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांच्यातून व्यक्त होत आहे.
दीपक पंडीत यांची धडाकेबाज कारवाई
सहाय्यक आयुक्त दीपक पंडीत यांनी आतापर्यत ५० कोटीहून अधिक मालाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करुन शासनाला महसूल मिळवून दिला होता. तसेच सीमा शुल्क विभागात वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचा गैरव्यवहाराचे प्रकरण चव्हाट्यावर आणले.त्यांची चौकशी सध्या प्रलंबित आहे. त्याशिवाय त्याचप्रमाणे त्यांना १० लाखाची लाच देणाऱ्या दोघाजणांना केंद्रीय गुन्हा अन्वेषणच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने कारवाई केली होती.