रिक्षातून प्रवास करणे ठरतेय धोक्याचे, रिक्षाचालकानेच प्रवाशाला निर्जनस्थळी नेऊन लुटले
By प्रशांत माने | Published: August 30, 2022 10:41 PM2022-08-30T22:41:05+5:302022-08-30T22:49:01+5:30
याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
डोंबिवली - रिक्षातून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. बाजुला बसलेल्या सहप्रवाशाकडून लुटण्याच्या घटना आधी घडल्या असताना एका रिक्षाचालकाने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने प्रवाशाला निर्जन स्थळी नेऊन त्याच्याकडील २५ हजाराचा मोबाईल आणि डेबीट कार्ड लंपास केल्याची घटना पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरात सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
टाटा पॉवर, पिसवली येथे राहणाऱ्या अभिषेक विश्वकर्मा यांनी सोमवारी पहाटे घरी येण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानका बाहेरुन रिक्षा पकडली. त्यावेळी रिक्षात बसलेल्या चालकाने आणि रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या दोघांनी खंबाळपाडा येथे एक प्रवाशी घेतो आणि पिसवली येथे सोडतो असे सांगितले. रिक्षाचालकाने रिक्षा मंजुनाथ कॉलेज, खंबाळपाडा येथील मागील बाजूस नेऊन एका नवीन बिल्डींगच्या बांधकामाच्या ठिकाणी विश्वकर्मा यांना नेले आणि त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने विश्वकर्मा यांच्या खिशातील मोबाईल आणि डेबीट कार्ड अशा वस्तू काढून तिघांनी रिक्षातून पळ काढला. या घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याआधीही अशा घटना घडल्याने रिक्षाचा प्रवास सुरक्षित राहीला नसल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून स्पष्ट झाले.