घर पाडताना सापडला खजिना, सोन्याचे शिक्के गायब; ५ मजुरांसह ४ पोलिसांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 07:40 PM2024-01-01T19:40:13+5:302024-01-01T19:47:36+5:30
येथील बाजार स्ट्रीटवरील एनआरआय हवाबेन बलिया यांच्या जुन्या घरातून हा सोन्याचा खजिना आढळून आला आहे.
जुन्या काळात तांब्याची भांडी, पितळाची भांडी आणि सोन्याची शिक्के होती. भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा, असं बोललं जातं. मात्र, कधी कधी हे वाक्य खरं ठरल्याची जाणीवही काही घटनांमधून होते. गुजरातच्यानवसारी जिल्ह्याच्या बिलिमोरा येथील एका जुन्या घराचे पाडकाम करत असताना बांधकाम मजुरांना मोठं घबाड सापडलं. त्या मजुरांनी सापडलेल्या सोन्याच्या हंड्यातून १९९ सोन्याची नाणी चोरली होती. या नाण्यांवर किंग जॉर्ज पंचम यांची प्रतिमा होती. याप्रकरणी, ५ मजुरांना अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
येथील बाजार स्ट्रीटवरील एनआरआय हवाबेन बलिया यांच्या जुन्या घरातून हा सोन्याचा खजिना आढळून आला आहे. सध्या हवाबेन बलिया ह्या युकेतील लीसेस्टर शहरात वास्तव्यास आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलिया यांनी ठेकेदार सरफराज करादिया आणि मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथील रहिवाशी असलेल्या ४ मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवसारी पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी म्हटलं की, एका जुन्या घरातून सोन्याच्या शिक्क्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी घरमालकाकडून २१ ऑक्टोबर रोजी फिर्याद देण्यात आली. चोरी करण्यात आलेल्या सोन्याच्या शिक्क्यांची संख्या अद्याप नक्की सांगता येत नाही. आरोपींविरुद्ध ४०६ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी घराचे पाडकाम करताना सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यांतून शिक्के चोरल्याचे कबुल केले. तर, वलसाड येथील ठेकेदारालाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, हे सोन्याचे शिक्के ८ ग्रॅम वजनाचे असून सन १९२२ सालचे आहेत. त्यावर, किंग जॉर्ज पंचम यांचे छायाचित्र आहे. बाजार भावाप्रमाणे या सोन्याच्या शिक्क्यांची किंमत ९२ लाख रुपये आहे. याप्रकरणी, मध्य प्रदेशातील ४ पोलिसांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सोन्याच्या शिक्क्यांमध्ये हिस्सेदारी घेतल्याचं आरोपींनी अलीराजपूरमधील सोंडबा पोलिसांना तपासावेळी सांगितले होते. सध्या पोलिसांनी जप्त केलेले सोन्याचे शिक्के न्यायालयाच्या ताब्यात आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतरच हे शिक्के सरकारला किंवा घरमालकाला देण्यात येतील, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.