खजिना घोटाळ्यातील सूत्रधार वर्षभराने गजाआड, तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून मौल्यवान वस्तू गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 12:00 PM2021-09-21T12:00:20+5:302021-09-21T12:00:52+5:30
तुळजाभवानी मंदिरात देवीचा खजिना आजही अस्तित्वात आहे. या खजिन्यात निजामासह, पोर्तुगीज सरकार तसेच त्यावेळच्या इतर भारतीय संस्थानांनी त्यांच्याकडील मौल्यवान दागिने, नाणी, हिरे, जडजवाहीर भेटवस्तू म्हणून देवीला अर्पण केल्या आहेत.
उस्मानाबाद : तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात भेटवस्तू म्हणून प्राप्त झालेल्या पुरातन मौल्यवान वस्तू गायब झाल्या आहेत. गतवर्षी झालेल्या चौकशीतून ही बाब समोर आल्यानंतर तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर फरार झालेल्या या आरोपीस सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यास सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
तुळजाभवानी मंदिरात देवीचा खजिना आजही अस्तित्वात आहे. या खजिन्यात निजामासह, पोर्तुगीज सरकार तसेच त्यावेळच्या इतर भारतीय संस्थानांनी त्यांच्याकडील मौल्यवान दागिने, नाणी, हिरे, जडजवाहीर भेटवस्तू म्हणून देवीला अर्पण केल्या आहेत. १९८० सालापर्यंत त्यांची व्यवस्थित नोंद होती. मात्र, यानंतर दोन वेळा झालेल्या पंचनाम्यात काही मौल्यवान वस्तूंची नोंद गायब झाली. यासंदर्भात तुळजापुरातील किशोर गंगणे यांनी माहिती अधिकारात हे पंचनामे प्राप्त करुन घेत देवीच्या खजिन्यातून सुमारे ३४ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७१ पुरातन नाणी, ७१ किलोग्रॅम चांदीच्या वस्तू गायब असल्याचे ॲड. शिरीष कुलकर्णी यांच्यामार्फत तक्रार देत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनेही वस्तू गायब असल्याचा अहवाल दिला.
त्यानुसार विद्यमान जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या निर्देशानुसार १३ सप्टेंबर २०२० रोजी धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून नाईकवाडी फरार होता. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला असून, सोमवारी त्यास तुळजापूर न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
बड्या हस्तींवर कारवाई कधी..?
पोलिसांच्या अटकेतील आरोपी नाईकवाडी हा आता या गायब वस्तूंच्या मागे कोण-कोण आहेत, त्यांची नावे घेतो का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांनी व काही लोकप्रतिनिधींनीही खजिन्यातील वस्तू भेट म्हणून पाहुण्यांना दिल्याची चर्चा आधीपासूनच आहे. त्यामुळे कोठडीत असलेल्या नाईकवाडीचा जबाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे.