मुलीच्या उपचारासाठी तिने जीव धोक्यात घालून 17 वेळा केली ड्रग्ज तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 12:01 AM2018-10-02T00:01:01+5:302018-10-02T00:01:44+5:30
शनिवारी शबानाला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. तिच्याजवळून सुरक्षा अधिकाऱ्यांनी २.५ किलो चरस हस्तगत केले आहे.
मुंबई - शहरात अमली पदार्थ तस्करांना हद्द पार करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाने कंबर कसली असताना तस्करांनी आता अमली पदार्थांच्या डिलेव्हरीसाठी महिलांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. नुकतीच केंद्रीय अमली पदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी आखाती देशात अमली पदार्थ नेणाऱ्या एका ४० वर्षीय सराईत महिलेला अटक केली आहे. मुलीला असलेल्या दुर्धर आजारासाठी पैसे नसल्यामुळे आरोपी शबाना बेगम (वय ४०) यांनी तब्बल १७ वेळा जीव धोक्यात घालून अमली पदार्थांची तस्करी केल्याचेे चौकशीत उघडकीस आले आहे.
मूळची हैद्राबादची रहिवाशी असलेल्या शबाना बेगम हिला १६ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी आहे. कित्येक वर्षानंतर झालेल्या या मुलीवर ती जिवापाड प्रेम करायची. मात्र नियतीला त्या दोघींचे प्रेम मान्य नव्हते. मुलीच्या जन्मानंतरच मुलीला एका दुर्धर आजार असल्याचे शबानाच्या लक्षात आले. त्यासाठी लागणारा वैद्यकिय खर्चही तितकाच होता. मुलीच्या उज्वल भविष्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी होती. अशातूनच ती अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या संपर्कात आली. शबानाच्या मजबूरीचा फायदा घेऊन हे तस्करी तिला आखाती देशात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाठवायचे.
आखाती देशात आता थंडी पडण्यास सुरूवात होत असल्याने त्या ठिकाणी चरस या अमली पदार्थाला मोठी मागणी असते. भारताच्या तुलनेत तिकडे अमली पदार्थांसाठी मोेठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात. मुलीला झालेल्या आजारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उभे करायचे असल्यामुळे शबाना ही तस्करीसाठी तयारी झाली. आतापर्यंत ती १६ वेळा परदेशात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी गेली होती. १७ व्या वेळी ती चरसच्या तस्करीसाठी हैद्राबादहून मुंबईला आली होती. मुंबईतून ती शारजा येथे आखाती देशात जाणार होती. मात्र याबाबत केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर शनिवारी शबानाला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. तिच्याजवळून सुरक्षा अधिकाऱ्यांनी २.५ किलो चरस हस्तगत केले आहे.
काही दिवसांपूर्वीत केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथक आणि मुंबई पोलिस अमली पदार्थ विरोधी पथकाने विमानतळाहून शेख फुरकाना खातून या महिलेला अटक केली होती. शबाना ही त्याच रॅकेटमधील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.