सर्पदंशावर भूमकाकडे उपचार, मेळघाटातील आदिवासी महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 09:41 PM2021-07-18T21:41:43+5:302021-07-18T21:44:08+5:30
मेळघाटात अंधश्रद्धेने घेतला महिलेचा बळी : डॉक्टरांकडून प्रयत्नांची शर्थ
चिखलदरा (अमरावती) : रात्री परिवारासह घरात असताना महिलेला सर्पदंश झाला. उपचारासाठी नजीकच्या गावात मांत्रिकाकडे नेण्यात आले. प्रकृती खालावल्यानंतर टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरानी प्रथमोपचार करून उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मेळघाटात पुन्हा अंधश्रद्धेने एका आदिवासी महिलेचा बळी घेतल्याचा हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.
फुलवंती शालिकराम कासदेकर (३०, रा. जामली आर) असे मृताचे नाव आहे. तिला मुलगा, मुलगी आहे. शनिवारी रात्री झोपेत तिला सर्पदंश झाला. काहीतरी चावले म्हणून सर्व जण खडबडून जागे झाले. टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर अचलपूर येथे वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
सापाचा शोध, नंतर भूमकाचे दार
फुलवंती कास्देकर यांना सर्पदंश झाल्याने कुटुंबीयांनी सर्वप्रथम सापाचा शोध घेतला. त्यानंतर काही वेळाने नजीकच्या खोंगडा, अंबापाटी येथील भूमकाकडे नेले. दोन ते तीन तास तेथे उपचार केल्यानंतर प्रकृती खालावल्याने टेंब्रुसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहाटे ३ वाजता आणण्यात आले. डॉ. चंदन पिंपरकर यांनी उपचार करून ३.३० वाजता उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठविले, परंतु उपजिल्हा रुग्णालयातसुद्धा अतिदक्षता विभाग नसल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वाटेत आसेगावनजीक तिचा मृत्यू झाला.
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर उपचार करण्यात आले. प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे व येथे अतिदक्षता विभाग नसल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
- सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर