थरार : नागपूर जिल्ह्यात अपघातात चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 11:43 PM2020-02-04T23:43:28+5:302020-02-04T23:52:34+5:30

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या दोन भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. कोराडी नजीकच्या बोखारा शिवारातील झुलेलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला.

Trembling: Four killed in accident in Nagpur district | थरार : नागपूर जिल्ह्यात अपघातात चार ठार

थरार : नागपूर जिल्ह्यात अपघातात चार ठार

Next
ठळक मुद्देबोखाऱ्याजवळ कारची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यूचांपा शिवारात ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक ठार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर ( कोराडी/उमरेड) : नागपूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या दोन भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. कोराडी नजीकच्या बोखारा शिवारातील झुलेलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. इकडे उमरेड-नागपूर महामार्गावर चांपा शिवारात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. चंद्रभान मुकुंदराव इंगोले (६५), नंदकिशोर ऊर्फ गुड्डू व्यंकटेश पुसदकर (३८), चिंधबाजी काकडे (५२) तिघेही रा. बैलवाडा अशी बोखारा शिवारात झालेल्या मृतांची नावे आहेत. हे तिघेही बैलवाडा येथील रहिवासी आहेत. प्रीतेश शंकर जांभुळे (३३) रा. खंडाळा, ता. चिमूर असे चांपा शिवारात झालेल्या अपघातातील मृताचे नाव आहे.


कोराडीजवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या झुलेलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कोराडी नाक्याकडून बैलवाड्याकडे परतत असताना दुचाकीवर असलेल्या तिघांना विरु द्ध दिशेने गुमथळ्याकडून नागपूरकडे जाणाऱ्या वॅगनार कारने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकीवरील तिघांनाही जागेवरच प्राण गमवावा लागला. मृतांमधील चिंधबाजी काकडे हे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत.
ग्रामपंचायतअंतर्गत पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटली असल्याने त्याला लागणारे साहित्य घेण्यासाठी हे तिघेही कोराडीला आले होते. परतत असताना बैलवाड्याकडे जात असताना समोरून येणारी वॅगनार क्रमांक एम.एच.४९/यू.७७९४ च्या चालकाने दुचाकीला धडक दिली. घटनेनंतर कारचालक सुनील मोरे (४०) हा पसार झाला. वाटसरूंनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर कोराडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत गावातील दीडशे ते दोनशे नागरिक त्या ठिकाणी गोळा झाले होते. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता होती. अशा स्थितीत पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दुसरा अपघात उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या चांपा शिवारात घडला. येथे भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीचालक प्रीतेश जांभुळे याचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. प्रीतेश जांभुळे फार्मासिस्ट (एमआर) होता. सहा महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला. यामुळे तो नागपूर दिघोरी परिसरात किरायाच्या खोलीत पत्नीसमवेत वास्तव्याला होता. मंगळवारी नागपूर येथून दुचाकीने (क्र. एमएच/४० एडी ९७२८) खंडाळा (ता. चिमूर) येथे निघाला. अशातच चांपा परिसरात असताना उमरेडकडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकची (एम.एच. ४०/ ए.के. ९८८६) जोरदार धडक लागली. दुचाकी चेंदामेंदा झाली असून ट्रकसुद्धा पलटला. ट्रकमध्ये डस्ट असल्याचे समजते. प्रीतेशचे वडील शंकर जांभुळे हे उमरेड येथील जीवन विकास विद्यालयात कर्मचारी होते.

बैलवाड्यात शोककळा
घटनेचे वृत्त कळताच बैलगाडा गावात शोककळा पसरली. चंद्रभान इंगोले यांच्या मुलाचा विवाह ठरलेला आहे. त्यामुळे घरी लग्नाच्या तयारीची लगबग होती. चिंधबाजी काकडे हे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत. त्यांची घरची स्थिती अत्यंत दयनीय आहे. नंदकिशोर पुसदकर हा व्यवसायाने मेकॅनिक आहे. तिघांची स्थिती बेताची आहे. या तिघांच्या मृत्यूची बातमी बैलवाड्यात पोहोचली तेव्हा सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. रात्री अनेकांच्या चुली पेटल्या नाहीत. तरुण, वृद्ध मंडळी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर सर्वांचा ताफा पोलीस स्टेशनकडे वळला.

सामूहिकरीत्या होणार अंत्यसंस्कार
या तिघांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सर्व गाव शोकमग्न झाले आहे. घराघरातून रडण्याचा
आक्रोश ऐकायला येत होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या, बुधवारी या तिघांवर सामूहिकरीत्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आरोपी सुनील मोरेविरुद्ध भादंविच्या कलम ३०४, २७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
सुनील मोरे याचा याच परिसरात सिमेंट पाईप बनविण्याचा व्यवसाय आहे. मूळचा गुमथी येथील असलेला मोरे सध्या मानेवाडा येथे राहतो. तो आपल्या शेतीतील काम करून मानेवाडाकडे परतत असताना हा गंभीर अपघात झाला.

Web Title: Trembling: Four killed in accident in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.