गोड-गोड बोलण्याला फसली अन् सर्वस्व लुटवून बसली! वृद्धाचा विवाहितेवर अत्याचार
By नितिन गव्हाळे | Published: September 21, 2023 08:41 PM2023-09-21T20:41:36+5:302023-09-21T20:42:04+5:30
६५ वर्षीय वृद्धाला न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
नितीन गव्हाळे, अकोला : विवाहितेच्या परिस्थितीचा फायदा उचलून आणि तिला विविध प्रकारचे आमिषे दाखवून सातत्याने विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आरोपी वृद्धाला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. उमरी भागातील एका ३६ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार शेगाव येथील विष्णू संपाळे (६५) याने रामदासपेठ भागात एक कंपनी सुरू करून कार्यालय थाटले होते. या कंपनीमध्ये ही विवाहिता कामाला लागली होती.
कार्यालयात कोणी नसल्याचे पाहून वृद्ध तिच्याशी लगट करायचा. तिला माझे पत्नीशी पटत नाही, तिच्याकडून कोणतेही सुख मिळत नाही. असे विवाहितेला सांगायचा. विवाहितेचेसुद्धा पतीशी पटत नसल्यामुळे ती वृद्धाच्या गोड-गोड बोलण्याला फसली. वृद्धही तिला नवनवीन वस्तू खरेदी करून द्यायचा. त्यामुळे विवाहितेशी वृद्धाची जवळीक वाढत गेली. कार्यालयात कोणी नसताना तो तिच्याशी लगट करायचा. अश्लील चाळे करायचे. त्यालाही विवाहितेची मूकसंमती असायची. त्यामुळे वृद्धाची हिंमत वाढली. त्याने तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केला. विवाहितेला न सांगता, लॅपटॉपमध्ये गुपचूप व्हिडीओ काढायचा. नंतर वृद्धाची कंपनी बुडाल्यामुळे विवाहितेने नोकरी साेडली.
त्यानंतरही वृद्ध तिला संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करायचा. वृद्ध घरी यायचा. व्हिडीओ, फाेटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. वृद्धाचा त्रास असह्य झाल्याने, अखेर विवाहितेने १९ सप्टेंबर रोजी रामदासपेठ पोलिस ठाणे गाठले आणि वृद्धाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने वृद्ध विष्णू संपाळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.
विवाहितेच्या घरी पोहोचवायचा वस्तू
आरोपी विष्णू संपाळे हा विवाहितेची गरज ओळखून तिच्या घरी जबरदस्तीने फ्रीज, टीव्ही, कुलरसारख्या वस्तू पाठवायचा. असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दरम्यान, या वस्तू कोठून येताहेत? याची साधी चौकशीही विवाहितेच्या कुटुंबीयांनी केली नाही. त्यामुळे पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले.