बनावट सिम कार्ड विकणाऱ्या त्रिकुटास अटक; भोईवाडा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:01 PM2022-01-21T18:01:28+5:302022-01-21T18:05:39+5:30
Crime News :या त्रिकुटाकडून विविध कंपन्यांचे तब्बल ३८८ मोबाईल सिम कार्ड जप्त करून जवळपास २ लाख २३ हजार १६२ रुपयांचा मुद्देमाल देखील पोलोसांनी जप्त केला आहे.
नितिन पंडीत
भिवंडी - मोबाईल सिम कार्ड खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे आधारकार्ड घेऊन त्यांना सिमकार्ड दिल्यानंतर त्याच आधारकार्डवर इतरांचे बनावट फोटो लावून चार ते पाच बनावट सिम कार्ड तयार करून देणाऱ्या त्रिकुटाला भोईवाडा पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. या त्रिकुटाकडून विविध कंपन्यांचे तब्बल ३८८ मोबाईल सिम कार्ड जप्त करून जवळपास २ लाख २३ हजार १६२ रुपयांचा मुद्देमाल देखील पोलोसांनी जप्त केला आहे.
भोईवाडा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिसांना धामणकर नाका व त्यानंतर नागाव गायत्री नगर रोड या दोन ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईल सिमकार्ड विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांना याबाबत महिती दिली असता पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप निरी सुरेश घुगे यांच्या नेतृत्वा खाली पोलीस कर्मचारी रमेश आतकरी,अरविंद गोरले,किशोर सूर्यवंशी,विजय कुंभार,विजय ताठे या पथकाने ही कारवाई केली आहे . या कारवाईत बनावट सिम विकणाऱ्या सईद अब्दुल गफार शेख वय २४,मोहम्मद इरफान अन्सारी वय २३ व एक विधिसंघर्षग्रस्त बालक सर्व रा.नागाव फातमा नगर या तिघांना ताब्यात घेत तपासणी केली असता त्यांच्या जवळ वेगवेगळ्या आधारकार्डावर एकच फोटो वापरून वेगवेगळे नाव पत्ता लिहून आधारकार्डा सोबत छेडछाड करीत त्याचा वापर नवे सिमकार्ड ऍक्टिवेट करून ते निरनिराळ्या ग्राहकांना विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने या त्रिकुटा कडून व्होडाफोन,जिओ कंपनीचे सिमकार्ड , आधारकार्डा वर एकाच इसमाचे फोटो लावून वेगवेगळे क्रमांकांचे व नाव पत्यांचे तब्बल १५४ बनावट आधारकार्ड जवळ बाळगलेले आढळून आले आहेत.
एका वीज चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला असता ते दुसऱ्यांचे असल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत संशय बळावल्याने या गुन्ह्याचा तपास करताना हे घबाड पोलिसांच्या हाती लागले असून एकच फोटो वेगवेगळ्या आधारकार्डा वर लावून नाव पत्ता बदलुन हा प्रकार सुरु होता त्या सोबतच मोबाईल सिमकार्ड घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे सिमकार्ड ऍक्टिवेट करीत असताना ते ऍक्टिवेट न झाल्याचे भासवून पुन्हा ई के वाय सी मशीन वर अंगठा उमटविण्यास भाग पडून दुसरा सिमकार्ड ऍक्टिवेट करून तो परस्पर इतर व्यक्तीस विक्री केला जात असल्याची पद्धत या आरोपींनी वापरली होती. विशेष म्हणजे ज्या पुराव्यांवर हे कार्ड सुरू केले जात होते त्या आधारकार्डा वर फोटो महिलेचा नाव पुरुषाचे लिहून वापरले असताना मोबाईल सिमकार्ड देणारे कर्मचारी अधिकारी यांच्या संगनमताने हे कारस्थान सुरू असल्याचे बोलले जात असून त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असल्याची महिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे. आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता २७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे.