तरुणाला लुबाडणारे त्रिकुट गजाआड; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 08:05 PM2019-03-28T20:05:18+5:302019-03-28T20:07:28+5:30
याप्रकरणाचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा करत होती.
कल्याण - कंपनीमध्ये जमा झालेली रोख रक्कम तसेच धनादेश बँकेत जमा करण्यासाठी जाणा-या तरुणाकडील १६ लाख ६४ हजार २४० रुपयांचा ऐवज लुबाडणा-या मुख्य सुत्रधार योगेश राजवळ (२८), लखन रोकडे (२९), प्रतीक अहिरे (१९ सर्व रा. अंबरनाथ) या तिघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. या तिघांकडून १४ लाख ८० हजार रुपये आणि ३ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
उल्हासनगरमधील एका कंपनीत कामाला असलेला शशिकांत चौहान कंपनीत जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी १८ मार्च रोजी दुपारी १२ च्या सुमारास जात होता. रामबाग परिसरात त्याला एकाने अडवले. साथीदारांच्या मदतीने शशिकांतला मारहाण केली. त्यानंतर आंबिवली येथे नेऊन त्याच्याकडील रोख रक्कम असलेली बॅग, त्याची दुचाकी, मोबाईल आणि पाकिट घेऊन दोघे पसार झाले. याप्रकरणी शशिकांतने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणाचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा करत होती.
तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार राजवळ याच्यासह रोकडे आणि अहिरे यांना अटक केली. या तिघांना कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.