बनावट ईमेलद्वारे फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 01:20 PM2020-05-29T13:20:30+5:302020-05-29T13:22:52+5:30
पुरवठादार कंपनीचा ईमेल समजून ठगांच्या खात्यात १५ लाख ८० हजार
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात बनावट इमेलद्वारे फसवणुकीच्या घटना डोके वर काढत असताना, मालमत्ता कक्षाने अशाच एका टोळीतील त्रिकूटाला बेडया ठोकल्या आहेत. ५ दिवस आरोपींच्या घराखाली पाळत ठेवून नायजेरियन कादिरी अली (५१) सह मालवणीतील
संतोष झा (३५), मोसेस तुला (४५) यांना बेडया ठोकल्या आहेत.
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दितील एका औषध उत्पादन, केमिकल्स आयात करणे व व्यापार करणाऱ्या कंपनीला या ठगांनी १५ लाख ८१ हजार रूपयांचा गंडा घातला होता.
कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी एका पुरवठादार कंपनीकडून १५ लाख ८१ हजार रूपयांचा माल खरेदी केला होता. त्याचे पैसे देणे बाकी होते. १२ मे रोजी तक्रारदार यांच्या कंपनीच्या ईमेल आईडीवर पुरवठादार कंपनीशी साधर्म्य असलेला मेल धडकला. त्यात लॉकडाऊनमुळे रक्कमेची गरज असल्याने, खरेदी केलेल्या मालाचे पैसे नियमित बँक खात्यात न करता दुसऱ्या खात्यात हस्तातंरीत करण्यास सांगितले. आणि बँक खात्याचा तपशीलही पाठविला. त्यानुसार कंपनीने आरटीजीएसद्वारे पैसे पाठवले. याबाबत कंपनीला कॉल करून कळविले. मात्र आपण असा कुठलाही ई मेल पाठविला नसल्याची माहिती कंपनीकडून मिळताच त्यांना धक्का बसला. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुह्या नोंद करत हा तपास पुढील तपासासाठी मालमत्ता कक्षाकड़े वर्ग केला.
मालमत्ता कक्षाचे पोलीस निरिक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी धीरज कोळी, लक्ष्मीकांत साळुंखे, सुनील माने, अमित भोसले, नंदकुमार पवार आणि अमलदार यांनी समांतर तपास सुरु केला. याच दरम्यान पैसे ट्रान्सफर झालेल्या खात्यातील माहितीद्वारे पोलीस झा पर्यन्त पोहचले. लॉकडाऊनमुळे तपास पथकाने मलावणी सह नायगाव परिसरात ४ ते ५ दिवस पाळत ठेवून आरोपींला बेडया ठोकल्या. यात, अली हा नायगावला राहण्यास आहे. तो तुलाच्या संपर्कात आला. त्याला जास्तीच्या कमीशनचे देणार असल्याचे सांगून सहभागी करुन घेतले. तुलाने झा याच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या बदल्यात कमीशन देण्याचे आमीष दिले. कंपनीकडून पैसे जमा होताच झा ने संबंधितांच्या खात्यात जमा केले. अशी माहिती समोर आली आहे. झा हा बेरोजगार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेकांना गंडा
अटक केलेल्या नायजेरियनने अशाप्रकारे अनेकांना गंडविल्याची शक्यता पोलिसांना आहे. त्यांनुसार त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे. तसेच त्याच्या अन्य साथीदाराबाबतही पोलीस तपास करत आहे.
बलात्काराचा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, पीडितेच्या घरी जाऊन केला चाकू हल्ला