ठाण्यात तिहेरी हत्याकांड! दीरासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची हत्या

By जितेंद्र कालेकर | Published: December 21, 2023 07:26 PM2023-12-21T19:26:08+5:302023-12-21T19:26:33+5:30

गुरुवारी सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झाला आहे.

Triple murder in Thane! Murder of his wife and two children on suspicion of having an immoral relationship with Deera | ठाण्यात तिहेरी हत्याकांड! दीरासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची हत्या

ठाण्यात तिहेरी हत्याकांड! दीरासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची हत्या

ठाणे: दीराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नी भावना अमित बागडी (२४), सहा वर्षीय मुलगी खुशी आणि आठ वर्षीय मुलगा अंकुश या तिघांची लाकडी बॅटच्या सहाय्याने अमित धर्मवीर बागडी (२९) या पतीने निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पाच पथके नेमल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

आरोपी अमित आणि त्याची पत्नी भावना यांचे आठ वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे. ते मुळचे हरयाणा राज्यातील खरडालीपूर (जि. इसार) येथील रहिवाशी आहेत. अमितला दारुचे प्रचंड व्यसन असल्यामुळे भावना त्याला सोडून ठाण्यातील कासारवडवली जयवंत शिंदे यांच्या चाळीत राहणारा त्याचाच सख्खा लहान भाऊ (तिचा दीर) विकास धर्मवीर बागडी याच्यासोबत गेल्या सात वर्षांपासून मुलांसह राहत होती. 

अमित कधीतरी पत्नी आणि दोन्ही मुलांना भेटण्यासाठी ठाण्यात यायचा. तसाच तो तीन दिवसांपासून ठाण्यात आला होता. मुलांना भेटण्याच्याच निमित्ताने तो भावाच्याच घरात मुले आणि पत्नीसोबत वास्तव्याला होता. नेहमीप्रमाणे त्याचा भाऊ विकास हा त्याच्या हाऊसकिपिंगच्या कामासाठी गुरुवारी (२१ डिसेंबर रोजी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. 

सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात भावजय भावना तसेच दोन मुले ही रक्ताच्या थारोळयात मृतावस्थेत आढळली. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची लाकडी बॅटही होती. त्याने ही माहिती तातडीने त्याचे घरमालक जयवंत शिंदे (५०) यांना दिली. शिंदे यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, कासारवडवलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत रोकडे, सहायक पोलिस निरीक्षक सुहास हटेकर आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपीने मात्र तोपर्यंत तिथून पळ काढला होता.

पती-पत्नींमध्ये वाद
अमितचा भाऊ विकास सकाळी घराबाहेर पडल्यानंतर पती आणि पत्नींमध्ये वाद झाल्याची शक्यता आहे. पत्नी आपल्या भावाकडे वास्तव्याला असल्याची सल त्याच्या मनात होती. तर पतीच्या दारुच्या व्यसनाला पत्नी त्रासली होती. यातूनच त्यांच्यात वाद होऊन त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. मात्र, हत्याकांडाचे नेमके कारण स्पष्ट नसल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठिवण्यात आले आहेत.

आरोपीच्या शोधासाठी चार पथके
आरोपी अमित हा मुळचा हरियाणाचा असल्यामुळे बोरीवली, ठाणे येथील रेल्वे स्थानक त्याचबरोबर अन्यत्र शोधासाठी कासारवडवलीची दोन, चितळसरचे एक तसेच गुन्हे शाखेचे एक अशी चार पथके तैनात केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. तिचे धाकट्या भावाबरोबर राहणे हे अमितला पटत नव्हते, त्यांच्यातील अनैतिक संबंधाचा त्याला संशय असण्याची तसेच अन्यही कारणातून ही हत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोपीचा भाऊ विकास याच्यासह त्याच्या अन्य नातलगांकडेही याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: Triple murder in Thane! Murder of his wife and two children on suspicion of having an immoral relationship with Deera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.