TRP Scam: मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या मालकाला दाखवले वॉन्टेड
By पूनम अपराज | Published: October 24, 2020 09:23 PM2020-10-24T21:23:44+5:302020-10-24T21:25:57+5:30
TRP Scam : या प्रकरणात फक्त मराठी वाहिनी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता पाच वाहिन्यांवर थेट आरोप झाले आहेत.
मुंबई - बनावट टीआरपी प्रकरणात आतापर्यंत 9 लोकांना अटक करण्यात आली आहे, परंतु शनिवारी सीआययूने पहिल्यांदा रिपब्लिक चॅनलचा मालक आणि ऑपरेटरला वॉन्टेड दाखविला. सीआययूने हिंदी चॅनल न्यूज नेशन आणि महामुव्ही चॅनलच्या मालकांना आणि चालकांना देखील वॉन्टेड दाखवले आहे. या प्रकरणात फक्त मराठी वाहिनी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता पाच वाहिन्यांवर थेट आरोप झाले आहेत.
20 ऑक्टोबर रोजी सीआययूने दोन आरोपी रामजी वर्मा आणि दिनेश विश्वकर्मा यांना शनिवारी न्यायालयात नव्याने रिमांडसाठी हजर करण्यात आले. याच रिमांड अर्जात सीआययूने पाच आरोपींना पाहिजे असलेले दाखवले आहे. यात पहिल्या क्रमांकावर अभिषेक कोळवणे याचे नाव आहे, तर दुसरे, तिसरे, चौथे क्रमांकावर रिपब्लिक, न्यूज नेशन आणि महामुव्ही वाहिन्यांचे मालक / चालक असे लिहिले आहेत. त्यांचे मालक कोण आहे हे सीआययूने अद्याप गुप्त ठेवले आहे.
अटक लवकरच होऊ शकते
वॉन्टेड आरोपींच्या यादीत पाचवे नाव रॉकीचे लिहिले आहे. रिपब्लिक व इतर वाहिन्यांची नावे रिमांड प्रतीमध्ये आल्यानंतर आता सीआययू त्याच्या मालकांना आणि ऑपरेटरला समन्स पाठवू शकते. या प्रकरणात फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हे निश्चित आहे की, रिपब्लिकचे मालक आणि इतर आरोपी वाहिन्यांनाही अटक केली जाऊ शकते.