TRP Scam News: टीआरपी घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांत; तपास पथके रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:20 AM2020-10-12T02:20:26+5:302020-10-12T06:50:42+5:30
TRP Scam Republic TV News, आरोपी मेस्त्रीच्या खात्यात एक कोटी जमा
मुंबई : अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’ वाढवणाऱ्या या रॅकेटची व्याप्ती केवळ मुंबईसह महाराष्ट्रातच नव्हे, अन्य राज्यांतही पसरल्याचे अटक आरोपींच्या चौकशीत उघडकीस आले आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेची पथके तपासासाठी सात राज्यांमध्ये रवाना झाली आहेत. तर, अटक आरोपी बोमपेल्ली राव मिस्त्री याच्या बँक खात्यात १ कोटी रुपये जमा झाले. दर दोन महिन्याने त्याच्या खात्यात ४ ते ५ ठिकाणांहून २० ते २५ लाख जमा होत होते.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाचे (सीआययु) प्रमुख सचिन वाझे यांच्या पथकाने टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश करत ४ जणांना बेड्या ठोकल्या. ही चौकडी १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठड़ीत (पान -- वर)आहेत. यात हंसा कंपनीचा विशाल भंडारी, टीआरपीसाठी पैसे पुरविण्याचे काम करणारा बोमपेल्ली राव मिस्त्रीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांचा समावेश आहे.
रविवारी सकाळी भंडारीसह त्याच्या मालाडच्या घरी घेण्यात आलेल्या तीन तासांच्या झडतीत एक डायरी पथकाच्या हाती लागली आहे. त्यात बॅरोमिटर आणि चॅनेल्सची नावे आणि आर्थिक व्यवहाराच्या नोंदी आहेत. प्राथमिक तपासात त्यात तीन चॅनेल्सपेक्षा अधिक चॅनल्सची नावे असून त्यानुसार ज्या लोकांना पैसे द्यायचे आहेत त्यांची नोंद आरोपी विशालने नोंद करून ठेवली आहे. विशालने त्याच्या डायरीत बॅरोमीटर बसविण्यात आलेल्या १८०० घरांचे तपशीलही नोंदवून ठेवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार रिपब्लिक, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा चॅनेल्सच्या व्यतिरिक्त आणखी काही चॅनेल्स संशयाच्या भोवºयात आले आहेत.
तो अहवाल हंसाचा नाही
काल रिपब्लिक चॅनेलवर एक शो ऑन एअर करण्यात आला. ज्यात हंसा नावाच्या कंपनीच्या अहवाल आहे असे सांगून त्या शोमध्ये इंडिया टुडे वर आरोप करण्यात आले. हंसाने तो अहवाल आपला नसल्याचे पोलिसांकडे स्पष्ट केले आहे.
‘रिपब्लिक’चा खानचंदानी हजर
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी चौकशीसाठी एकूण सहा जणांना समन्स बजावले होते. यात रिपब्लिक वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विकास खानचंदानी, मुख्य ऑपरेटर अधिकारी हर्ष भंडारी, प्रिया मुखर्जी, वितरण विभागप्रमुख घनश्याम सिंग यांच्यासह हंसाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी खानचंदानी सकाळी ९ वाजता हजर झाले. तसेच हर्ष भंडारी यांचीही चौकशी करण्यात आली.
टीव्हीवर दिसणाºया कंटेंटशी आमचे देणेघेणे नसते, त्यासाठी एडिटोरियल विभाग जबाबदार असतो, असे विकास खानचंदानी यांचे म्हणणे आहे. तर, रिपब्लिक टीव्हीचे सीएफओ शिवा सुब्रह्मण्यम सुंदरम यांनी आईच्या कोविड आजाराचे कारण देत १४ आॅक्टोबरनंतर चौकशीला हजर राहू, असे सांगितले आहे. दुसरीकडे रिपब्लिक या वृत्तवाहिनीचे हेड घनश्याम सिंह यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन वेळा समन्स बजाविले होते. मात्र, ते हजर झाले नाहीत. ते दमणच्या सॅडी रिसॉर्टमध्ये वास्तव्याला असल्याचे मोबाइल लोकेशनवरून समजताच तेथे दमण पोलिसांच्या मदतीने त्यांची सात तास चौकशी करत जबाब नोंदवण्यात आला आहे.