खळबळजनक! ट्रकमध्ये भरले होते गाजर; पोलिसांनी चेक करताच बसला धक्का, मिळालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 12:55 PM2024-02-24T12:55:06+5:302024-02-24T12:58:16+5:30
पोलिसांना संशय आला आणि त्यांनी ट्रक थांबवून त्याची झडती घेतली असता त्यांना धक्का बसला.
राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध दारू मोठ्या प्रमाणात जप्त केली आहे. गाजराच्या आड लपवून ही दारू नेली जात होती. पोलिसांना संशय आला आणि त्यांनी ट्रक थांबवून त्याची झडती घेतली असता दारू असलेली पाहून त्यांना धक्का बसला. पोलिसांनी दारू जप्त केली असून आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 25 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
पोलीस अधीक्षक गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पंजाब सीमेवर असलेल्या पतली चेकपोस्टवर दारूची ही खेप पकडण्यात आली आहे. येथे गाजराच्या नावाखाली लाखो रुपयांची अवैध दारू ट्रकमध्ये भरून गुजरातला नेली जात होती. पोलिसांनी संशयाच्या आधारे हा ट्रक पंजाब सीमेवरील चौकीवर अडवून त्याची तपासणी केली. ट्रक गाजरांनी भरलेला होता. त्याखाली दारू ठेवण्यात आली होती.
जप्त केलेल्या दारूची बाजारातील किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. चालकाच्या चौकशीत ही दारू पंजाबमधून गुजरातमध्ये नेण्यात येत असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी पंजाबचे रहिवासी दलेर सिंग आणि प्रीतपाल सिंग यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. अवैध दारू तस्करीच्या या जाळ्यात आणखी कोणाचा हात आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.
पंजाब आणि हरियाणामधून राजस्थानमार्गे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दारू नेली जाते. गुजरातमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे तस्कर पंजाब आणि हरियाणामधून स्वस्त दरात दारू विकत घेतात, गुजरातमध्ये नेऊन जास्त किमतीत विकतात. राजस्थानमध्ये यापूर्वीही अनेक वेळा दारूची एवढी मोठी खेप पकडण्यात आली आहे. श्रीगंगानगरला लागून असलेल्या हनुमानगड जिल्ह्यात बटाट्याखाली लपवून आणली जात असलेली दारू पकडण्यात आली होती.