दीड लाख अंड्यांचा ट्रक पळविणाऱ्या टोळीस केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 08:27 PM2018-11-22T20:27:17+5:302018-11-22T20:36:07+5:30
१८ नोव्हेंबरला पहाटे 3.15 वाजता पहाटे नबी शेख नावाचा वाहन चालक आपल्या 17 वर्षांच्या मुलासह अंड्यानी भरलेला ट्रक हैदराबादहून अंबरनाथ येथील महाराष्ट्र एग्ज सेंटर येथे खाली करण्यासाठी येत होता.
ठाणे - हैदराबाद येथुन अंड्यानी भरलेला ट्रक अंबरनाथ बदलापूर रोडवर थांबवून लुटून नेणाऱ्या आरोपींना उल्हासनगर गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे आणि अंड्यानी भरलेला ट्रक हस्तगत केला आहे.
१८ नोव्हेंबरला पहाटे 3.15 वाजता पहाटे नबी शेख नावाचा वाहन चालक आपल्या 17 वर्षांच्या मुलासह अंड्यानी भरलेला ट्रक हैदराबादहून अंबरनाथ येथील महाराष्ट्र एग्ज सेंटर येथे खाली करण्यासाठी येत होता. त्यावेळी अंबरनाथ बदलापूर रोडवर ट्रक घेऊन जात असताना एक मारुती सुझुकी कार त्याच्या ट्रकच्यासमोर आडवी घालण्यात आली. त्यातून चार इसम उतरून त्यांनी वाहन चालक व त्याचा मुलगा मुज्जमील या दोघांना मारहाण केली. त्यांना खाली उतरवून मारुती सुझुकीमध्ये कोंबून डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले आणि चारजणांपैकी एकाने ट्रक चोरी करून पळवून नेला. वाहन चालक व त्याच्या मुलाला रायटे टिटवाळा येथील जंगलात निर्जन स्थळी सोडून दिले.त्यानंतर वाहन चालक व त्याच्या मुलाने त्याबाबत अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला मारहाण करून लुटल्याची व अंड्यानी भरलेला ट्रक चोरून नेल्याची तक्रार दिली. त्याप्रमाणे पोलीस ठाण्यामध्ये भा. दं. वि. कलम 394, 341, 363, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. उल्हासनगर गुन्हे शाखा कक्ष क्रमांक 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे व श्रीकृष्ण नावले व त्यांच्या पथकाने वाहन चालक व त्याच्या मुलाला डोळे बांधून ज्या ठिकाणाहून नेले होते. त्या ठिकाणापासून तपासला सुरुवात केली तसेच गुप्त बातमीदारांना सक्रिय केले त्यांच्याकडुन माहिती मिळवली असता भिवंडी येथे राहणाऱ्या सादात नावाचा इसम या गुन्ह्यात सहभागी असल्याचे कळले. त्याप्रमाणे त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपणच चार साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे भिवंडी वाडा रोडवरील महापोली गावानजिक फक्की गोडावून येथून अंड्यानी भरलेला ट्रक ताब्यात घेण्यात आला. सादात हा अंडी विक्रीच्या व्यवसायात असल्याने त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून अंडयानी भरलेला ट्रक चोरण्याचा प्लान केला होता. ट्रक चोरल्यानंतर त्यातील 22,000 रुपयाची अंडी त्याने मार्केटमध्ये विकल्याचे कबुल केलं. धंद्यात नुकसान झाल्याने व कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने व त्याच्या मित्रांनी मिळुन अंड्याचा ट्रक चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी आतापर्यंत 4,12,766 रुपये किंमतीचे 1,16,400 अंडी, पाच लाखांचा अशोक लेलँन्डचा ट्रक आणि गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपयाची मारुती सुझुकी असा एकूण 14,12,766 रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे. उर्वरित आरोपींना लवकरच़ पकडण्यात येईल असे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगितल.