कळंबमध्ये तलाठी, कोतवालाला जिवे मारण्याचा वाळूमाफियाचा प्रयत्न, सहा जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:35 AM2019-02-07T00:35:50+5:302019-02-07T00:36:21+5:30

नीरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी दिवसाढवळ्या वाळूने भरलेला हायवा ट्रक कळंब येथील गावकामगार तलाठी व कोतवाल यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

Trying to kill Talathi क्ष Kotwala in Kalamb | कळंबमध्ये तलाठी, कोतवालाला जिवे मारण्याचा वाळूमाफियाचा प्रयत्न, सहा जणांविरोधात गुन्हा

कळंबमध्ये तलाठी, कोतवालाला जिवे मारण्याचा वाळूमाफियाचा प्रयत्न, सहा जणांविरोधात गुन्हा

googlenewsNext

कळंब - नीरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी दिवसाढवळ्या वाळूने भरलेला हायवा ट्रक कळंब येथील गावकामगार तलाठी व कोतवाल यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : कळंब (ता. इंदापूर) येथील तलाठी दत्तात्रय भानुदास दराडे व कोतवाल सुभाष श्रीरंग घोडके यांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर वाळूची गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. कळंब येथील तलाठी दत्तात्रय दराडे व कोतवाल घोडके हे सोमवारी (दि. ४) कामानिमित्त इंदापूरला दुपारी जात असताना वाळूने भरलेला ट्रक जाताना दिसला. सदरची वाळू कुठून आणली, गाडी कारवाईसाठी घेऊन चला, असे सांगितले असता तलाठी यांना धक्काबुक्की केली. त्यामध्ये दराडे यांचा मोबाईल खाली पडला. त्या वेळी तलाठी व कोतवाल यांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये तलाठ्याच्या मोबाईलवरून ट्रक गेल्याने मोबाईलचा अक्षरश: चुराडा झाला. याबाबत तलाठी संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष विलास भोसले यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की आरोपींना नियमानुसार अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. सदरील घटनेची फिर्याद वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली असून, गणेश अशोक बनसोडे (रा. वालचंदनगर), अक्षय संजय जाधव, सूरज लाला पवार, अक्षय बाळासाहेब डोंबाळे (सर्व रा. कळंब) व दोघे अज्ञात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेअंमलदार सदाशिव जगताप पुढील तपास करीत असून सदरील घटनेतील आरोपी
फरार आहेत.

वाळूमाफियांची वाढती मुजोरी
नीरा नदीपात्रात राजरोस रात्रंदिवस जेसीबी यंत्राच्या साह्याने बेसुमार वाळूउपसा केला जात आहे. यातून ग्रामीण भागातील तरुण गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. अनेक वाळूमाफियांकडे गावठी कट्टे असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मुजोर वाळूमाफिया कोणालाही जुमानत नाहीत. भरधाव वेगाने अवजड वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक व वाळू भरून वाहतूक होत असल्याने रस्त्याची वाट लागली आहे. वाळू व्यवसायातून कमी वेळेत अधिक पैसे मिळत असल्याने गुंडगिरी वाढली आहे.
४वाळूमाफियांच्या टोळ्या तयार होऊ लागल्या आहेत. महसूल विभाग व पोलीस यंत्रणेने वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की त्या वाळूमाफियांच्या गुन्हेगारीविरोधात कडक मोहीम राबविण्यात येणार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे कानगुडे यांनी सांगितले. जगताप हे अधिक तपास
करीत आहेत.

कडेठाण परिसरात बेसुमार वाळू, मातीउपसा
वरवंड : दौंड तालुक्यातील वरवंड, कडेठाण, हातवळण या परिसरामध्ये बेसुमार वाळू, मातीउपसा चालू असून, त्याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मातीची उघड्यावरच वाहतूक केली जात आहे. यामुळे दुचाकीस्वारांना गाडी चालवताना डोळ्यांमध्ये माती जाऊन कित्येक वेळा अपघात झाले आहेत.
वरवंड, कडेठाण व हातवळण या ठिकाणी बेकायदा माती व वाळू उपसा करून वाहतूक केली जात आहे.वाळूउपसा मोठ्या प्रमाणात चालू असून महसूल विभागाच्या तलाठी व सर्कल यांच्या कार्यालयासमोरूनच वाहतूक केली जात असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई का होत नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या मातीउपशाची परवानगी घेतली जात नाही.
या माती व वाळू माफियांना आवर घालणार कोण, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. हे वाळू माफिया तर दिवसाढवळया वाळूची वाहतूक करीत असल्याचे दिसते. वरवंड येथे शाळेच्या वेळेत कित्येक वाहने वाळू व मातीने भरलेली वेगाने जाताना दिसत आहेत.
यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माती माफियांनी कमी परवानगी घ्यायची व जास्त माती उपसायची, असा तडाखा लावला आहे. परवानगीच्या नावाखाली प्रशासनाची फसवणूक करीत असून त्यामुळे महसूल बुडत आहे. या मातीउपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

४ ब्रास वाळूला ३० हजार रुपये
अवसरी : आंबेगाव तालुक्यातील घोडनदीतून वाळूउपसा गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने वाळू मिळत नाही. मिळाली तरी ४ ब्रास वाळूला २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे तालुक्यातील सरकारी, खासगी कामे रखडत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुणे जिल्ह्यात पाच वर्षांपासून वाळूउपसा बंद असल्याने वाळू ठेकेदार जिल्ह्याबाहेरुन वाळू आणत असतात. त्यामुळे ३ ते ४ ब्रास वाळूसाठी ग्राहकांना ३० ते ४० हजार रुपये मोजावे लागत आहे. वाळू ठेकेदाराला डिझेल, टायर, शासकीय पावत्या त्याचप्रमाणे महसुल विभागाने वाळूचा ट्रक अडविल्यास चिरीमिरी द्यावी लागते. त्यामुळे ठेकेदाराला महाग वाळू विकण्याशिवाय पर्याय नाही.
तालुक्यातील तहसीलदार सुषमा पैकेकरी यांनी चोरून वाळू वाहतूक करणाºया ट्रक मालक त्याचप्रमाणे चोरून मुरुम वाहतूक करणाºया गाडी मालकावर कारवाईचा बडगा उचलल्याने वाळू व मुरुम वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहे. महसुल विभागाने अधिकारी वाळूचा ट्रक सोडविण्यासाठी मोठ्या रकमा घेत असल्याचे वाळू ठेकेदार सांगतात.

Web Title: Trying to kill Talathi क्ष Kotwala in Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.