नालासोपाऱ्यात तणाव; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 09:42 PM2018-10-31T21:42:27+5:302018-10-31T21:42:50+5:30
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला नियंत्रणात आणले. मृत रितू सिंगचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
नालासोपारा - नालासोपारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आणि रुग्णालयाची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला नियंत्रणात आणले. मृत रितू सिंगचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
नालासोपारा येथे राहणाऱ्या रितू सिंग (वय ३५) या महिलेला दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यांच्या सुर्यदिप नावाच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सिंग यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टर अनिल कुमार यादव यांनी त्यांना अन्य खाजगी रुग्णालयात हलवले. तेथे उपचारादरम्यान सिंग यांचा मृत्यू झाला. रितू सिंग यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या रुग्णालयात जाऊन तोडफोड करून गोंधळ घालण्यास सुरवात केली. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी डॉक्टरांना पोलीस ठाण्यात नेले. माझ्या बहिणाला काय झाले, त्यांच्यावर कुठले उपचार सुरू आहेत याची डॉक्टर यादव यांनी काहीच माहिती दिली नाही, असा आरोप मृत रितू सिंग यांची बहिण सुमित्रा सिंग यांनी केला आहे. आम्ही डॉक्टर अनिलकुमार यादव याच जबाब घेतला असून काय उपचार केले ती कागदपत्रे जमा केली आहेत. ती पडताळणीसाठी जिल्हा वैद्यकीय समितीकडे पाठविण्यात आली आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर मृत महिलेचा मृत्यू निष्काळजीपणामुळे झालेला आहे अथवा नाही, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.