HDFC बँकेत अवैधरित्या पैसे काढण्याचा प्रयत्न; तीन बँक कर्मचाऱ्यांसह 12 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:18 PM2021-10-19T17:18:33+5:302021-10-19T17:18:51+5:30
Three HDFC Bank Employees Arrested : बँकेने सांगितले की, एफआयआरच्या आधारे पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांसह सर्व संशयितांना अटक केली आहे. आम्ही चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोपी बँक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
नवी दिल्ली : एचडीएफसी (HDFC) बँकेशी संबंधीत मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनिवासी भारतीयांच्या (NRI) काही बँक खात्यातून अवैधरित्या पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तीन एचडीएफसी कर्मचाऱ्यांसह बारा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. बँकेने या प्रकरणातील आरोपी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. (Twelve People Including Three HDFC Bank Employees Arrested For Their Involvement In Attempts To Make Unauthorized Withdrawal From A Very High Value NRI Account)
या प्रकरणात तीन एचडीएफसी कर्मचाऱ्यांसह 12 लोकांना अटक करण्यात आली आहे. या लोकांनी बँकेच्या खात्यातून अवैधरित्या ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी 66 वेळा प्रयत्न केले होते, असे दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले.
याचबरोबर, आरोपींनी फसवणूक करून खातेदाराचे चेकबुक मिळवले होते, ते जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, आरोपींनी खातेधारकाच्या अमेरिकेतील मोबाईल नंबरसारखा नंबरही खरेदी केला होता, असे केपीएस मल्होत्रा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बँकेने एक निवेदन जारी केले आहे. आमच्या सिस्टिममध्ये काही खात्यांवर व्यवहार करण्याचे अनधिकृत आणि संशयास्पद प्रयत्न लक्षात आले. आमच्या सिस्टिमने आम्हाला सूचित केले. यानंतर आम्ही पुढील कारवाईसाठी अंमलबजावणी यंत्रणांना कळवले आणि गुन्हा दाखल केला, असे बँकेने म्हटले आहे.
तसेच, बँकेने सांगितले की, एफआयआरच्या आधारे पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांसह सर्व संशयितांना अटक केली आहे. आम्ही चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोपी बँक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीत बँक प्रशासन पूर्ण सहकार्य करत आहे.