लिंक लाइक करणं पडलं एकवीस लाखांना! घरबसल्या काम शोधताना महिलेची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 21:57 IST2025-02-15T21:57:09+5:302025-02-15T21:57:25+5:30
याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे...

लिंक लाइक करणं पडलं एकवीस लाखांना! घरबसल्या काम शोधताना महिलेची फसवणूक
सातारा : घरबसल्या इन्स्टाग्रामवर ऑनलाइन काम आहे का? हे पाहणाऱ्या महिलेला मोबाइलवर लिंक पाठविण्यात आली. ही लिंक लाईक केल्यास पाठविलेल्या पैशावर वीस टक्के डिस्काऊंट देण्याचे आमिष दाखवून तब्बल २१ लाख ३८ हजारांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
मंजुळा राहुल घाडगे (वय ३९, रा. दौलतनगर, सातारा) या त्यांच्या घरी मोबाइलवर ऑनलाइन इन्स्टाग्रामवर काम आहे का, हे पाहत होत्या. त्यावेळी त्यांना ‘फ्लेम स्क्रीबलर’ यांची जाहिरात आली. त्यानंतर संबंधिताने घाडगे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. फोनवर तसेच मेसेज करून त्यांना नेमके काय काम आहे, याची माहिती दिली. त्यांनी त्याचे नाव विचारले असता त्याने ‘निरंजना’ असे सांगितले. या निरंजनाने घाडगे यांच्या मोबाइलवर वेगवेगळ्या लिंक पाठविल्या. या लिंक ओपन करून त्यातील प्रोडक्ट लाइक केल्यानंतर घाडगे यांनी पाठविलेल्या पैशांवर २० टक्के डिस्काऊंट देण्याचे त्याने आमिष दाखविले. सुरुवातीला पैसे पाठविल्यानंतर घाडगे यांना डिस्काऊंट मिळाला. त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यामुळे घाडगे यांनी त्यांच्या बँकेच्या खात्यावरून एनईएफटी, आरटीजीएस, नेफ्टद्वारे अशाप्रकारे तब्बल २१ लाख ६८ हजार पाठविले. त्यापैकी त्यांना ३० हजार रुपये परतसुद्धा मिळाले. परंतु २१ लाख ३८ हजार २०० रुपये अद्याप त्यांना परत मिळाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाडगे यांनी इन्स्टाग्रामधारक निरंजना याच्यावर दि. १४ रोजी दुपारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे हे अधिक तपास करीत आहेत.
अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या कोणत्याही लिंक ओपन करू नये. निश्चितपणे आपली फसवणूक होईल. यावर उपाय म्हणून स्वत: सतर्क राहणे आणि आपल्या घरातल्यांना जागृत करणे, हा आहे.
-अरुण देवकर, पोलिस निरीक्षक, सातारा