विनयभंग प्रकरणाला वेगळं वळण; अभिनेता शाहबाझ खान यांच्या मुलीला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 17:15 IST2020-02-14T17:09:41+5:302020-02-14T17:15:57+5:30
वर्सोवा पोलिसांत तक्रार दाखल; खान यांच्यावरही विनयभंगाचा आरोप

विनयभंग प्रकरणाला वेगळं वळण; अभिनेता शाहबाझ खान यांच्या मुलीला मारहाण
मुंबई - बॉलीवूड अभिनेते शाहबाझ खान यांच्या सतरा वर्षीय मुलीला अंधेरीत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर याच प्रकरणी एका मुलीच्या तक्रारीवरून खान यांच्या विरोधातही ओशिवरा पोलिसांतविनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्सोवा परिसरात मंगळवारी काही मुलींनी खान यांच्या मुलीला किरकोळ वादातून मारहाण केली. घडलेला प्रकार तिने घरी सांगताच खान यांनी मुलीसोबत संबंधित ठिकाणी जाऊन मारहाण करणाऱ्यांबाबत चौकशी केली. मात्र त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळू न शकल्याने त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान, ओशिवरा पोलीस ठाण्यात खान यांच्या विरोधात एका मुलीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलीला मारहाण करणाऱ्या त्या मुलीला जाब विचारण्यासाठी मी जोगेश्वरीच्या मिल्लतनगर परिसरात गेले होतो. त्यावेळी तिथल्या एकीकडे मी मारहाण करणाऱ्या मुलींबाबत विचारणा केली असता तिने माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली. तिच्याशी बोलताना मी कोणताही अपशब्द काढला नाही किंवा तिला अपमानास्पद वागणूक दिली नाही. मात्र त्याच मुलीने माझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार केल्याने मलाही धक्का बसला. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तेथे सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तथ्य लवकरच सर्वांसमोर येईल.’