एटीएम फोडणाऱ्या टाेळीचा छडा, दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 05:13 PM2021-08-14T17:13:56+5:302021-08-14T17:14:03+5:30
Crime News : चारचाकी वाहनास सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
बुलडाणा: एकाच रात्री जिल्ह्यातील तीन एटीम फोडून त्यातील ५६ लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा बुलडाणा पोलिसांनी छडा लावला असून या प्रकरणात राजस्थानातून दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एका चारचाकी वाहनास सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणात आणखी सहा जण असण्याची शक्यता असून त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी १४ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे एटीएम फोडणाऱ्या या टोळीचा छडा लावण्याचे आव्हान बुलडाणा पोलिसांनी लिलया पेलत अशक्यप्राय वाटणारा हा गुन्हा उघडकीस आणला आहे. ३० जुलै रोजी चिखली तालुक्यातील शेलूद उंद्री आणि खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील स्टेट बँकेचे तीन एटीएम फोटून त्यातील ५६ लाख रुपयांची रोकड लंपास करत पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे केले होते. दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी सायबर सेलसह एकूण पाच पथके गठीत केली होती. गोपनीय माहिती व अमरावती परीक्षेत्र आणि मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूरपर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा छडा पोलिसांनी लावला. त्यानंतर पोलिसांच्या राष्ट्रीयस्तरावरील गुन्ह्यांची माहिती देणाऱ्या व्हॉट्स अप ग्रूपवर अनुषंगीक गुन्ह्या संदर्भाने काही दुवे पोलिसांना मिळाले. त्या आधारावर गठीत करम्यात आलेल्या पाच पथकांनी तब्बल सात दिवस राजस्थानमध्ये तळ ठोकत या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी, गॅस सिलींडर, दोन ऑक्सिजन सिलींडर आणि सहा मोबाईल जप्त केले. सोबतच राजस्थानमधील नरेश चौधरी (रा. अजारका, जि. अल्वर) आणि आसामचा नागरिक असलेल्या परंतू अजारका परिसरातच राहणाऱ्या कमरूल इस्लाम अब्दुल गणी यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून काही हत्यारेही १० ते १२ ऑगस्ट दरम्यान जप्त केली. अटक करण्यात आलेल्या या आरोपींना १३ ऑगस्ट रोजी चिखली न्यायालयात हजर केले असता न्यायालायने त्यांची २१ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतरकर हे करीत आहेत.
कारवाईत यांचा होता सहभाग
या कारवाईत अपर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोडे, हेमराजसिंग राजपूत, एसडीपीअेा दीपक बरकते, अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय बळीराम गिते, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, विजय मोरे , एपीआय विलासकुमार सानप, मनिष गावंडे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोलिस अमलदार गजानन आहेर, शरद गिरी, पंकज मेहर, विजय सोनोने, गजानन गोरले, विजय वारूळे, शत्रुघ्न शिंदे, राजू आडवे, कैलास ठोंबरे, उषा वाघ यांनी सहभाग घेतला होता.