शत्रूचा वचपा काढण्यासाठी हत्यारासह थांबलेले दोन जणांना बेड्या; पिस्तूल व कोयते जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 09:00 PM2021-01-19T21:00:04+5:302021-01-19T21:00:53+5:30
आरोपींना वेळीच जेरबंद केल्याने पुढील अनर्थ टळला..
धनकवडी : भांडणात मार खाल्ल्याने शत्रुचा वचपा काढण्यासाठी पिस्तूल आणी कोयते घेऊन थांबलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांना यश मिळाले असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली. आरोपींना वेळीच जेरबंद केल्याने पुढील अनर्थ टळला.
ओंकार ऊमेश सातपुते, वय २१ वर्षे, राहणार यशोदीप सोसायटी, संघर्ष चाळ चौक, वारजे माळवाडी व प्रितम विठठल ठोंबरे, वय १९ वर्षे, राहणार यशोदीप चौक, बालाजी रेसीडन्सी, वारजे माळवाडी, अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर वारजे पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा व इतर दोन ते तीन ठिकाणी बॉडी ऑफेन्सचे गुन्हे दाखल आहेत. त्याची काही महिण्यापुर्वी एका व्यक्तीबरोबर भांडणे झाली होती. याचा बदला घेण्यासाठी त्यांनी हत्यारांची जमवा जमव केली होती. या हत्याराच्या सहाय्याने ते समोरील व्यक्तीचा वचपा काढण्यासाठी दबा धरुन बसले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तपास पथकातील पोलीस स्टाफ हे पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संतोष भापकर, सचिन पवार व राहूल तांबे यांना खबर मिळाली की, जांभुळवाडी येथे दोन व्यक्ती लुटमारी करण्याचे उद्देशाने थांबले आहेत. तसेच त्यांचेकडे गावठी पिस्टल व हत्यारे आहेत. ही माहिती मिळताच पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे यांनी त्यांचे स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन संशयास्पदरित्या थांबलेल्या ओंकार सातपुते व प्रितम ठोंबरे यांना शाईन मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्यांची अंगझडतीत घेतली असता ओंकार सातपुते याचे जवळ एक गावठी पिस्टल, एक जिवंत राऊंड व एक धारदार कोयता मिळुन आला तर प्रितम ठोंबरे याचे जवळ एक धारदार कोयता मिळुन आला. त्यांना अटक करुन आर्म ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचेकडे इतर काही गुन्हे केले आहेत का? याबाबत सखोल तपास केला असता त्यांनी त्यांचा आणखी एक साथीदार साहील आनंद मोरे, वय १८ वर्षे, राहणार त्रिमुती सोसायटी, यशोदिप चौक वारजे माळवाडी याचे मदतीने १६ जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी आंबेगाव बुद्रुक येथील श्री गणेश सुपर मार्ट व त्याचे जवळ असलेले सुप्रिया किराणा दुकान अशा दोन दुकानांचे शटर उचकटुन चोरी केल्याचे कबुली दिली. या गुन्हयातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी २ लाख १८ हजार इतकी रक्कम त्यांचेकडुन जप्त केली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस उपायुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकांचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक,नितीन शिंदे, अंमलदार रविन्द्र भोसले, अण्णासाहेब माडीवाले, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, निलेश खोमणे, गणेश सुतार, सर्फराज देशमुख, सचिन पवार, समिर बागसिराज, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, व विक्रम सावंत यांनी केली.