नालासोपारा येथे हत्या करून ६ वर्षे फरार असलेल्या दोन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 05:37 PM2023-04-08T17:37:22+5:302023-04-08T17:39:03+5:30
बिलालपाडा नाका येथे राहणारे सुनिल राजेश सहाणी (३६) यांचे संतोष भवन येथे राहणारे दिवाकर राकेश सिंग यांच्यासोबत २१ ऑक्टोबर २०१८ साली गौराईपाडा येथे भांडण झाले होते.
मंगेश कराळे
नालासोपारा - तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३६ वर्षीय एकाची हत्या करून सहा वर्षे फरार असणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शनिवारी दिली आहे.
बिलालपाडा नाका येथे राहणारे सुनिल राजेश सहाणी (३६) यांचे संतोष भवन येथे राहणारे दिवाकर राकेश सिंग यांच्यासोबत २१ ऑक्टोबर २०१८ साली गौराईपाडा येथे भांडण झाले होते. यांच्यात झालेल्या भांडणाचा मनात राग धरुन २४ ऑक्टोबर २०१८ साली सुनील यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले होते. तुळींज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी दिवाकर राकेश सिंग याला त्यावेळी अटक केली होती. पोलीस ठाणे व तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखा यांनी गुन्हयात पाहिजे आरोपी रमेशकुमार कोतवाल सिंग, सुधाकर राकेश सिंग यांचा शोध घेवुनही ते मिळून आले नव्हते.
या हत्येच्या गुन्हयातील फरार आरोपीतांचा शोध घेणेबाबत वरिष्ठांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. सदर गुन्हयाचा मध्यवर्ती गुन्हे शाखेकडुन समांतर तपास चालु होता. त्याअनुषंगाने गुन्हयातील फरार आरोपी हे गुन्हा घडल्यापासुन गोंडा, उत्तरप्रदेश येथे आपले अस्तिस्व लपवुन राहत आहेत व आता ते नालासोपाऱ्याच्या बिलालपाडा परिसरात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याबाबतची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक व पोलीस हवालदार राजाराम काळे यांना मिळाली होती.
त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी एक पथक तयार केले होते. सदर पथकाने त्याचे भेटण्याचे ठिकाणाबाबत माहिती प्राप्त करुन सदर ठिकाणी सापळा कारवाई करुन आरोपी रमेशकुमार कोतवाल सिंग (४०) आणि सुधाकर राकेश सिंग (२०) यांना ७ एप्रिलला शिताफिने ताब्यात घेण्यात आले आहे. नमुद गुन्हयाच्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास केल्यावर सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना अटक करून पुढील तपासासाठी तुळींज पोलिसांना ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पोलीस पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार राजाराम काळे, अशपाक मुल्ला, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, सुनिल कुडवे, हनुमंत सुयवंशी, संतोष चव्हाण यांनी केली आहे.