फ्रेंचाईजी देतो म्हणून अडीच लाखाला गंडविले!
By राजकुमार जोंधळे | Published: September 27, 2022 11:52 PM2022-09-27T23:52:09+5:302022-09-27T23:52:33+5:30
याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर : एका कंपनीची फ्रेंचाईजी देण्याचे आमिष दाखवत एकाला तब्बल दोन लाख ६४ हजार २५० रुपयांचा ऑनलाइन गंडविल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद येथे २६ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर रोजी घडली. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी उमा महेश्वर बलय्या स्वामी (वय १९, रा. शिरुर ताजबंद, जि. लातूर) एका कंपनीच्या इझी स्टोअर्स आणि लॅजिस्टीकची फ्रेंचाईजी मिळण्यासाठी एका लिंकद्वारे अप्लाय करण्यास सांगण्यात आले. दरम्यान, त्यानंतर एका मोबाइल क्रमांकावरून वारंवार कॉल करण्यात आला. यावेळी ई-मेल आयडी रजिस्ट्रेशन फॉर्म भरून फिर्यादीला १५ हजार ५०० रुपये भरण्यास सांगितले. २९ ऑगस्ट २०२२ रोजी बॅंक खात्यावर १५ हजार ५०० रुपये भरले. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी सिक्युरिटी डिपॉझिटसाठी ३८ हजार ७५० रुपये भरले. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी अकाउंट ओपन करण्यासाठी ८५ हजार रुपये भरण्यास सांगितल्याने ते भरले. त्यानंतर १ सप्टेंबर २०२२ रोजी शेलर लिस्ट व फ्रेंचाईजी फी मिनीशॉपसाठी एक लाख २५ हजार रुपये त्यांनी सांगितलेल्या बॅंक खात्यावर भरण्यास सांगितले.
फिर्यादीने पैसे भरल्यानंतर त्यांना अप्रुल फॉर्म आणि पेमेंट स्लीप पाठवून प्रोडक्ट पॅक होत आहे, असे सांगण्यात आले. ६ सप्टेंबर २०२२ रोजी एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावाने ९८ हजार ६५० रुपयांचे बिल पाठविण्यात आले. त्याबाबत संशय आला असता, दिलेल्या कंपनीच्या पत्त्यावर जाऊन पडताळणी केली असता, तेथे ऑफिस नसल्याचे आढळून आले. त्यांना आपली दोन लाख ६४ हजार २५० रुपयांना फसवणूक झाल्याचे समजले. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक कामठेवाड करत आहेत.