समाज कल्याणच्या लाचखोर निरीक्षकास अडीच वर्षांचा कारावास, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
By सचिन राऊत | Published: September 30, 2022 07:53 PM2022-09-30T19:53:06+5:302022-09-30T19:58:11+5:30
२००५ मध्ये स्वीकारली होती पाचशे रुपयांची लाच
अकोला: अकोट तालुक्यातील मूकबधिर संस्था दर्यापूर तालुक्यातील एका दुसऱ्या गावात स्थलांतरित करण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना समाज कल्याण निरीक्षकाला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्यानंतर या प्रकरणातील दोषी लाचखोर निरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोन वर्ष सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त पाच महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे.
समाज कल्याण विभागाचा लाचखोर निरीक्षक ब्रह्मदेव श्रीराम लोळे वय ४६ वर्ष याच्याकडे अकोट तालुक्यातील सावरा येथील मूकनायक सेवा संस्थेद्वारा कार्यान्वित असलेली श्री संत गाडगेबाबा मूकबधिर विद्यालय ही संस्था दर्यापूर तालुक्यातील नांदरून या गावात स्थलांतरित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी लाचखोर समाज कल्याण निरीक्षक लोळे यांनी २५ जानेवारी २००५ रोजी पाचशे रुपयांची लाच मागितली होती. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर लाचखोर समाज कल्याण निरीक्षक ब्रह्मदेव लोळे यास दोषी ठरवीत दोन वर्ष सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच १५ हजार रुपयांच्या दंडही ठोठावला आहे.