अडिच किलोचे हस्तिदंत तस्करी करणाऱ्या दुकलीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:43 PM2019-09-23T23:43:19+5:302019-09-23T23:46:20+5:30
शोभेच्या वस्तू, औषधे आदींकरिता वापर होत असल्याने हस्तिदंताला आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे.
मुंबई - घाटकोपर परिसरात हस्तिदंत विकण्यासाठी आलेल्या दोघांना मुंबई गुन्हेच्या कक्ष 7 च्या पोलिसांनीअटक केली असून त्यांच्याकडून हत्तीच्या दोन सुळ्यांचे तुकडे जप्त केले आहेत.
बिहार राज्यातून हस्तिदंत आणल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, ते कोणाला विकणार होते, याविषयी अद्याप स्पष्ट झाले नाही. सचिन पासवान (26) आणि सरोजकुमार उमाशंकर पासवान (24) अशी या अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेजण 19 सप्टेंबर रोजी सकाळी घाटकोपर येथील एलबीएस रोडवरील सर्वोदय रुग्णालयाच्याजवळील बसस्थानकावर हस्तिदंत विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना अटक केली.
या दोघांकडून पोलिसांनी 2 किलो 141 ग्रॅमचे हत्तीदंत जप्त केले आहेत. या दोघांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात 39, 45, 45(अ), 59 वन्यजीव संरक्षन कायदाअन्वये 1972 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त केलेले हत्तीच्या दोन सुळ्यांचे तुकडे वनविभागामार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये हे दात अस्सल असल्याचे स्पष्ट झाले आहे. शोभेच्या वस्तू, औषधे आदींकरिता वापर होत असल्याने हस्तिदंताला आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे. मात्र, दातांची किंमत जाहीर केल्यास दातांच्या तस्करीसाठी हत्तींची हत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे वनविभागाने या दातांची किंमत जाहीर करण्यास बंदी घातली आहे, तरी अडीच लाखांच्या आसपास या दांतांची किॆमत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.