लग्नाचे आमीष दाखवित अडीच लाखांचा गंडा; तोतया नवरीसह एजंटला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 06:53 PM2021-12-03T18:53:25+5:302021-12-03T18:54:42+5:30
Fraud Case : आशा संतोष शिंदे (३१, रा.सुंदरवाडी, चिखलठाणा, जि.औरंगाबाद) व एजंट किरण भास्कर पाटील (४५, आमडदे, ता.भडगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
चाळीसगाव जि. जळगाव : विवाह लावून देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करीत दोन लाख ४० हजारांचा ऐवज घेवून रफुचक्कर झालेल्या तोतया नवरी व एजंट अशा दोघांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनीअटक केली आहे. आशा संतोष शिंदे (३१, रा.सुंदरवाडी, चिखलठाणा, जि.औरंगाबाद) व एजंट किरण भास्कर पाटील (४५, आमडदे, ता.भडगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
डामरुण ता. चाळीसगाव येथील घनश्याम मुरलीधर पाटील (४८) यांच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने आशा शिंदे व एजंट किरण यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून दोन लाख रुपये व ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेतले होते. मात्र लग्न लावण्यापूर्वी दोन लाख ४० हजारां’चा ऐवज घेवून आशाने घरातून धूम ठोकली.
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला घनश्याम पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर महिनाभराने तोतया नवरी व तिच्या साथीदारालाही अटक करण्यात आली. दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.