वृद्ध महिलेच्या पिशवीतून अडीच लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 05:23 PM2019-08-16T17:23:53+5:302019-08-16T17:26:11+5:30
एका महाविद्यालयात मुलीला प्रवेश घेण्यासाठी लागणारी प्रवेश फी उषा बुधवारी घेऊन जात होत्या.
भोसरी - वृद्ध महिलेच्या पिशवीतून अडीच लाख रोकड आणि सोन्याचे दागिने चोरले. ही घटना बस प्रवासादरम्यान धावडेवस्ती भोसरी येथे बुधवारी (दि. १४) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.
उषा गणेश खरमटल (वय ६५, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. लग्नानंतर त्यांच्या मुलीला महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे आहे. नाशिक मधील मालेगाव येथे एका महाविद्यालयात मुलीला प्रवेश घेण्यासाठी लागणारी प्रवेश फी उषा बुधवारी घेऊन जात होत्या. त्या दुपारी दीडच्या सुमारास कासारवाडी येथील नाशिक फाट्यावरून पुणे-धुळे या बसमध्ये (एमएच. २० बीएल. २६००) बसल्या. बस धावडेवस्ती येथे आली असता त्यांनी त्यांची पिशवी तपासली असता पिशवीमध्ये पैसे आणि सोन्याचे दागिने नसल्याचे त्यांना समजले. त्यांच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने २ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.