कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यासह दोघे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 09:27 PM2021-12-16T21:27:14+5:302021-12-16T21:28:46+5:30
Bribe Case : एसीबीच्या पथकाने १२ नोव्हेंबर रोजी याची पडताळणी करून १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात गोसावी आणि राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
ठाणे: एका वाईन शॉपवर कारवाई न करण्यासाठी ५० हजार ३०० रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाचा दुय्यम निरीक्षक निलेश गोसावी (३९,रा. कोपरी, ठाणे) याच्यासह दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी अटक केली आहे. दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदाराने चालविण्यासाठी घेतलेल्या वाईन शॉपवर ११ नाव्हेंबर २०२१ रोजी उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये मदतीसाठी तसेच वाईन शॉपवर भविष्यात कारवाई न करण्यासाठी दुय्यम निरीक्षक गोसावी यांनी स्वत:साठी तसेच राज्य उत्पादन शुल्कच्या कोपरी येथील इतर अधिका:यांसाठी दरमहा हफ्ता म्हणून ६४ हजारांच्या रकमेची मागणी केली. लाचेची ही रक्कम स्वीकारण्यास खाजगी व्यक्ती उमेश राठोड यांना प्रोत्साहित केले. गोसावी यांनी मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेत राठोड यांनी तडजोड करून ५० हजार ३०० रुपयांच्या रकमेची मागणी केली. याप्रकरणी सबंधित तक्रारदाराने ११ नोव्हेंबर रोजी ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीच्या पथकाने १२ नोव्हेंबर रोजी याची पडताळणी करून १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात गोसावी आणि राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.