शरद मोहोळ खून प्रकरणात मास्टरमाइंडसह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 08:05 AM2024-01-16T08:05:22+5:302024-01-16T08:05:31+5:30
शरद मोहोळची ५ जानेवारीला कोथरूड येथे हत्या झाल्यानंतर पोलिस मारेकऱ्यांच्या मागावर होते.
नवी मुंबई / पुणे : गँगस्टर शरद माेहोळ खून प्रकरणात मास्टरमाइंडचा चेहरा समोर आणण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. मुळशी तालुक्यातील गुंड विठ्ठल महादेव शेलारसह (३६) दोघांना पुणे गुन्हे शाखेने पनवेलमध्ये अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक झाली आहे.
या दोघांसह आणखी ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. शरद मोहोळची ५ जानेवारीला कोथरूड येथे हत्या झाल्यानंतर पोलिस मारेकऱ्यांच्या मागावर होते. रविवारी रात्री काही आराेपी पनवेलमधील धाब्यावर येणार असल्याची माहिती मिळाली हाेती.
विठ्ठल शेलारची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर
गणेश मारणे टोळीचा सदस्य असलेला विठ्ठल शेलार याने २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याची पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. तो मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये त्याला मोक्काअंतर्गत अटकही झाली होती.